भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून राजकीय नाट्य रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 03:26 PM2020-09-03T15:26:58+5:302020-09-03T15:28:04+5:30
सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केल्याचा जिल्हाध्यक्ष दानवेंचा दावा
जालना : भाजपचे जिल्हा प्रमुख आ. संतोष दानवे हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत. दोन दिवसांपूर्वी आ. दानवे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. ही कार्यकारिणी जाहीर झाल्यावर त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सोशल मीडियासह भाजपच्या लोणीकर समर्थकांमध्ये उमटले आहेत. या मुद्यावरून संतप्त पदाधिकाऱ्यांनी लोणीकरांना साकडे घालून याबद्दल बैठक बोलावून आमच्या भावना ऐकून घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी आ. बबनराव लोणीकर यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात बैठक बोलावली होती.
एकूणच गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच आ. लोणीकर हे जरी पक्ष म्हणून एकाच पक्षात असले तरी, फारसे सख्य नाही हे वास्तव सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपची कार्यकारिणी निवडताना दानवेंनी लोणीकरांना किंवा त्यांचा मुलगा जि.प.सदस्य राहुल लोणीकर किंवा त्यांच्या गटाच्या एखाद्याला विश्वाासात घेणे, चर्चा करणे ही अपेक्षा लोणीकरांनी ठेवणे म्हणजे आश्वर्यच म्हणावे लागेल. आणि झालेही तसेच. दरम्यान मंगळवारी गणेश विसर्जनाचा मुहूर्त साधून तालुका उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि अन्य विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळपास ६२ जणांची घोषणा केली.
ही यादी बाहेर पडताच त्यावर लोणीकरांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बद्दल त्यांच्या परतूर तसेच मंठा आणि काही तालुक्यातील समर्थकांची बैठक बुधवारी दुपारी भाजपच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. यावेळी राहुल लोणीकर, वीरेंद्र धोका, सुनील आर्दड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गेल्यावर्षी परतूर तसेच मंठा तालुक्याला तीन उपाध्यक्ष होते.
पक्ष नेतृत्वाकडे म्हणणे मांडणार
भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. येथे छोटे-छोटे निर्णयही सर्व सहमतीने घेतले जातात. परंतु जिल्हा कार्यकारिणी निवडताना आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षित होते. परंतु जिल्हाघ्यक्षांकडून तसा कुठलाच संपर्क साधण्यात आला नाही. आपण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सोबच भाजपमध्ये काम केले आहे. अनेक वाईट दिवस बघितल्यावर आज हे चांगले दिवस आले आहेत. परंतु याची जाणीव दानवे तसेच त्यांच्या मुलांकडून ठेवली नाही. यामुळे आजच्या बैठकीतील मुद्दे हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर शिष्टमंडळाला सोबत घेऊन कैफियत मांडणार आहोत.
- आ. बबनराव लोणीकर, परतूर
राजकारण करणे हा हेतू नाही
पक्ष चालवितांना जिल्हाध्यक्षांची मोठी कसोटी असते. कुठलाही निर्णय घेताना त्यातून प्रत्येकाचे समाधान करणे शक्य नसते. ही कार्यकारिणी निवडताना आपण बराच समतोल राखण्याचा प्रयत्न केला. परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या नाराजी असतील तर त्याही आपण ऐकून घेऊ. दरम्यान पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची संवाद साधून वाद मिटविण्याचा प्रयत्न करू.
- आ. संतोष दानवे, जिल्हाध्यक्ष भाजप, जालना