नेत्यांची झाली गळाभेट; कार्यकर्त्यांची कधी होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:30 PM2019-04-09T18:30:37+5:302019-04-09T18:37:03+5:30
गावपातळीवर अद्याप कार्यकर्त्यांंचे मनोमिलन झालेले नाही
भोकरदन (जालना ) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपा - सेना व काँग्रेस - राष्ट्रवादी या पक्षाची युती व आघाडी आहे. मात्र अद्याप गावपातळीवर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंचे मनोमिलन झालेले नाही असेच सध्या चित्र आहे. यातच उन्हाचा पारा वाढल्यामुळे नेते व कार्यकर्त्यांची प्रचार करताना दमछाक होत आहे. कार्यकर्ते घामाघूम होताना दिसत आहेत, तर मतदार राजाही घराबाहेर पडत नसल्याचे चित्र भोकरदन तालुक्यात आहे.
भोकरदन तालुक्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाचा प्रभाव आहे. त्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रभाव ग्रामीण भागात जास्त आहे तर काँग्रेसचा प्रभाव शहरात आहे. या निवडणुकीसाठी भाजपा - सेना व काँग्रेस - राष्ट्रवादी या पक्षाची युती व आघाडी आहे. मात्र अद्याप गावपातळीवर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंचे मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे आज तरी भाजपाच्या प्रचारात सेनेचे पदाधिकारी दिसत नाही. शिवाय काँग्रेसच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी सरसावली नाही. त्यामुळे अजुनही कार्यकर्त्यांसाठी मनोमिलन होणे बाकी आहे.
रूसवे - फुगवे निघाले नसल्यामुळे आपण आता काय निर्णय घ्यावा. याचा मोठा पेचप्रंसग कार्यकत्यार्मंमध्ये निर्माण झाला आहे. शिवाय या दोन्ही पक्षाचे मित्र पक्ष असलेल्या आरपीआय, आठवलेगट, रासपाच्या पदाधिकाऱ्यांकडे अद्याप प्रचाराच्या गाड्याच गेल्या नाही. काँग्रेसच्या मित्रपक्षांची हीच परिस्थिती आहे. तालुक्यात गेल्या सहा महिन्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एका शिवसेनेच्या नेत्याचाच लोकसभेसाठी प्रचार केला होता.