लोखंडी पुलावरुन राजकारण तापले; युवा सेनेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:16+5:302021-06-17T04:21:16+5:30
जालना : जालना शहरातील नवीन आणि जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाच्या अचानक शुभारंभावरुन शहरात दिवसभर चर्चेला उधाण आले ...
जालना : जालना शहरातील नवीन आणि जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाच्या अचानक शुभारंभावरुन शहरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते. शिवसेना, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल बुधवारी दुपारी वाहतुकीसाठी सुरु केला होता. तर सायंकाळी पुन्हा हा पूल वाहने आडवी लावून भाजपाने बंद केला.
इंग्रजांच्या काळातील लोखंडी पूल जीर्ण झाल्याने तो पाडून त्या जागेवर नवीन पूल उभारण्यात आला. यासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून १३ कोटी रुपये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आणून या पुलाचे काम केले. पूल पूर्ण होऊन बरेच दिवस झाले होते. परंतु, उद्घाटनाचा सोहळा राहिल्याने वाहतुकीसाठी पूल बंद ठेवला होता. यामुळे शेजारी असलेल्या लहान पुलावरुन वाहतूक होत होती.
यामुळे अनेकवेळा येथे वाहतुकीची कोंडी होत होती. ही बाब लक्षात घेऊन सेनेचे युवा राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, घुगे, अंकुश पाचफुले, विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, निकाळजे, रोहिदास गंगातिवरे आदींनी पूल खुला केला.
दरम्यान शिवसेनेच्या या कृत्याचे भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त करुन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी १३ कोटी रुपये आणून हा पूल उभारला आहे. त्यामुळे केवळ राजकारण म्हणून पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तो सुरु करण्याची घाई ही राजकारणाला न शोभणारी आहे.
कागज के फूल महक जाते है... : आ. गोरंट्याल
कागज के फूल महक जाते है... ‘ए दौरे नवाजीश इस नयी दुनिया में कागज के फूल चुटकी में महक जाते है... असली हिरे की ओ शिफज अंधेरो में होती है. धूप में तो काच के तुकडे भी चमक जाते है...’ या खास शेरो शायरीतून आ. कैलास गोरंट्याल यांच्या शिवसेनेच्या या प्रयत्नाची खिल्ली उडवली. याचवेळी रितसर उद्घाटन झाल्यानंतर हा पूल सुरु होऊ शकला असता परंतु, केवळ एक स्टंट म्हणून शिवसेनेने बुधवारी पुलावरुन जो गोंधळ घातला तो शोभणारा नाही.