पालिकेभोवती फिरतेय जालन्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:54 AM2019-08-13T00:54:22+5:302019-08-13T00:54:46+5:30

येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. परंतु सर्व राजकारण फिरतेय ते जालना पालिकेभोवती.

The politics of Jalna revolving around the municipality | पालिकेभोवती फिरतेय जालन्याचे राजकारण

पालिकेभोवती फिरतेय जालन्याचे राजकारण

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जालना विधानसभा मतदारसंघात शंभरपेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. परंतु सर्व राजकारण फिरतेय ते जालना पालिकेभोवती. ही पालिका काँग्रेसच्या ताब्यात असून, जनतेतून नगराध्यक्ष निवडतांना देखील काँग्रेसच्या संगीता गोरंट्याल या राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप यांच्यातील कुरघोडीचे राजकारण त्याचे किस्से आजही तेवढेच ताज्या पध्दतीने चर्चिले जातात.
जालना पालिका ही बहुतांश काळ ही शिवसेना, भाजपच्या ताब्यात होती. तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांचा २००१ ते २००६ हा जनतेतून निवडून आल्यावरच्या काळात त्यांनी कल्पकतेने काही विकास कामे केली. त्याचेच गुणगान शिवसेनकडून आजही केले जात आहे. पालिकेच्या निवडणुकीत देखील महाविद्यालयीन मित्र असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल आणि माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांचाच वरचष्मा असतो. कधी पारडे काँग्रेसकडे तर कधी ते युतीकडे झुकते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शहरातून १२ नगरसेवक निवडून आणून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर ते मागे पडले.
आज जालना पालिका चर्चेत आली आहे, ती आयुक्तांच्या चौकशीवरून आणि अंदाज समितीने केलेल्या चौकशी अहवालात ओढलेल्या ताशेऱ्यांवरून अंदाज समितीने ते ताशेरे ओढले आहेत, त्या बद्दल आता आम्हाला सांभाळून घ्यावे अशी विनंती पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली. विशेष म्हणजे पालिकेत गेल्या कित्येक वर्षापासून अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे भरलेली नाहीत. त्याातच राजकीय हस्तक्षेप पदोपदी असल्याने आम्ही काम कसे करावे असा सवाल अधिकारी, कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही.
दरम्यान, जालना पालिकेतील गेल्या दहा वर्षातील चौकशी सुरू असली तरी काँग्रेसकडून शिवसेना-भाजपच्या ताब्यात पालिका असतानाच्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्याने आता केल्याने यात आणखी व्टिस्ट आला आहे. त्याच पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. परंतु तो अद्याप जिल्हाधिकाºयांकडून मंजूर झालेला नाही. राऊत यांनी जो राजीनामा देऊ केला आहे, तो त्यांनी नगराध्यक्षांकडे द्यावा, असे निकष असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी तसे केले नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच त्यांना पालिकेतील कामकाजाची खडान्खडा माहिती असल्याने त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अंतर्गत जलवाहीनीसह कर आकारणीच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे. आणि त्यातील अंतर्गत जलवाहिनीची चौकशी कररून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्याधिकाºयांना दिले आहेत.
पुन्हा खोतकर - गोरंट्याल लढत रंगणार
जालना विधानसभेच्या दृष्टीने राजमंत्री अर्जुन खोतकर यांनी आता पालिकेच्या कामकाजात उडी घेतली आहे. या चौकशीच्या भुंग्याने सध्या ते चांगलेच चर्चेत आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरंट्याल यांचे राजकारणच मुळात पालिकेतून सुरू झाले.
नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नंतर आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यामुळे शहराची नस अन् नस त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे अशा चौकांश्या त्यांच्यासाठी नवीन नाहीत. मध्यंतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे विधानसभे ऐवजी विधान परिषदेतून निवडणूक लढतील अशा अटकली लावल्या जात होत्या.
परंतु ही वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातच लढत जवळपास निश्चित मानली जात आहे. माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांना आता गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद दिल्याने ते आपोआच या शर्यतीतून दूर झाल्याचे मानले जात आहे.

Web Title: The politics of Jalna revolving around the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.