लोकसंख्या वाढली, सोयीसुविधा जैसे थे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:55 AM2019-07-11T00:55:39+5:302019-07-11T00:55:42+5:30
जालना जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांत जवळपास साडेसहा लाखांनी लोकसंख्या वाढली असली तरी सोयी-सुविधांत मात्र फारसा फरक पडला नाही.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांत जवळपास साडेसहा लाखांनी लोकसंख्या वाढली असली तरी सोयी-सुविधांत मात्र फारसा फरक पडला नाही. वाहनांची संख्या प्रचंड वाढली. तुलनेत रस्ते मात्र तसेच राहिले. शाळांच संख्या वाढली, गुणवत्तेच्या नावाने आनंदीआनंदच आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख २२ हजार ३५७ इतकी होती. २०११ च्या जनगणनेनुसार ती १९ लाख ५८ हजार ४८३ इतकी झाली. यात १० लाख १५ हजार ११६ पुरूष तर ९ लाख ४३ हजार ३६७ महिला होत्या. प्रशासकीय माहितीनुसार २०१९ मध्ये लोकसंख्या २२ लाख ६१ हजार ३३८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ७१.५२ टक्के आहे.
जालना जिल्ह्यात दहा वर्षांत जवळपास एक लाखापेक्षा अधिक दुचाकी वाढल्या आहेत. आज जिल्ह्यात एकूण दोन लाख ९५ हजार २११ दुचाकी असून, चारचाकी वाहनांची संख्या ही २० हजार ९०० आहे. ज्या प्रमाणे वाहनांची संख्या वाढली त्या तुलनेत रस्ते रूंद झाले नसून, जागोजागी वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळत आहे. ही वाहनांची वाढ आता कमी होणे शक्य नसल्याचे प्रादेशिक परिवहन निरीक्षक विजय काळे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात मोठे सात, मध्यम २४, तर लघु ९९९ असे एकूण १०३० उद्योग आहेत. दुग्ध व्यवसाय शीतकरण केंद्र २, सहकारी दूध संस्था १०८, एकूण सहकारी संस्था २८२८, सहकारी साखर कारखाने ५ असून, यातील चार सुरू आहेत
शाळांची संख्या वाढली; दर्जा घसरला
जालना जिल्हा हा पूर्वीपासून शैक्षणिकदृष्ट्या मागसलेला आहे. या जिल्ह्यात मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण हे आदिवासी जिल्ह्यांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील गावोगावी मराठी आणि त्या तुलनेत अधिक इंग्रजी शाळा दिसतात. परंतु शिक्षणाच्या विकेंद्रीकरणाखाली दर्जा हरवून बसला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगर पालिका तसेच खाजगी शाळांचा विचार केल्यास ही संख्या दोन हजार पेक्षा अधिक आहे. आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत जास्तीचे पैसे मोजून घालण्याकडे कल वाढला आहे. हे ठीक असले तरी, मराठी आणि अन्य विषयांमध्ये दर्जाला महत्त्व राहिले नाही. ही खंत शिक्षणतज्ज्ञ बी.वाय. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मुलींचा जन्मदर वाढला
जालना जिल्ह्यात गेल्या दशकभरात ज्या प्रमाणे लोकसंख्या वाढ झाली आहे, त्याच धर्तीवर मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. २०११ चा विचार केल्यास एक हजार मुलांमागे ९६० मुली जन्माला येत. हे प्रमाण आता ९२० वर आले आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसह महिलाकंकडून गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शनचा वापर वाढला आहे. वैद्यकीय सेवा-सुविधेचा विचार केल्यास त्यातही अत्याधुनिक उपचार पध्दतीचा समावेश झाला आहे. सरकारी प्रमाणेच खाजगी रुग्णालयांच्या संख्येतही दहा वर्षात लक्षणीय वाढ झाली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रे
नागरिकांना आरोग्याची सेवा पुरविण्यासाठी एक जिल्हा रूग्णालय, एक महिला रूग्णालय, ८ ग्रामीण रूग्णालये, ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१३ उपकेंद्रे आहेत. तसेच खाजगी रूग्णालयांची संख्याही मोठी आहे.