१८६ शिक्षकांची पदे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:33 AM2019-03-04T00:33:43+5:302019-03-04T00:34:12+5:30
शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
गत अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती करण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आदोंलने, उपोषणे करुन शिक्षक भरतीच्या मागणीचा जोर धरला होता. त्या अनुषगांने राज्य सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली असून, पहिल्या टप्प्यात १०,००१ जागा भरण्यासंदर्भात पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १८६ शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. यात मराठी माध्यमाच्या १६६ तर उर्दु माध्यमाच्या २० जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने शिक्षण विभागाला मागविली आहे. त्यानुसार माहिती गोळा करण्याचे काम सुरु असून, ही माहिती लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यामध्ये ३२५ पदे रिक्त आहेत. यापैकी १८६ शिक्षकांची पदे भरतीतून भरली जाणार आहे. शिक्षक भरतीमध्ये पात्र शिक्षकांना संधी मिळणार आहे.