बावन्न गावांचा वीजपुरवठा तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:35 AM2018-06-20T00:35:46+5:302018-06-20T00:35:46+5:30
जालना जिल्ह्यातील ५२ गावांचा वीजपुरवठा थेट विद्युत उपकेंद्रातून तोडल्याने ही गावे अंधारात डुबली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील ५२ गावांचा वीजपुरवठा थेट विद्युत उपकेंद्रातून तोडल्याने ही गावे अंधारात डुबली आहेत. आठही तालुक्यातील गावांचा त्यात समावेश आहे. त्यात अंबड १२ आणि घनसावंगीतील २८ गावांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या गावातील लोकांनी वीजेची थकबाकी भरावी म्हणून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वीज वितरणने ही थेट कारवाई केल्याची माहिती अधीक्षक अभियंता के. डी.हुमने यांनी दिली. त्यात विभाग क्रमांक एममध्ये जवळपास ७२ लाख तर विभाग क्रमांक दोन मध्ये एक कोटी ३३ लाख रूपयांची बिले थकली आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुख्य अभियंता गणेशकर हे जालना दौऱ्यावर आले होते.त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत वीज चोरी रोखण्यासह थकबाकी वसुलीच्या मुद्यावर चर्चा झाली होती. त्यांच्या सूचनेनुसार ही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आल्याचे हुमने यांनी सांगितले.
दरम्यान जालना शहरातील जे वीजमीटर फॉल्टी आहेत, ते तातडीने बदल्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेक वीजग्राहकांना चुकीच्या रीडिंगची बिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
याची दखल घेत, वीज मीटर रीडिंगचे काम देण्यात आलेल्या संस्थेसह वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी याचे सर्वेक्षण करून कुठे वीज मीटर रीडिंग चुकत आहे, याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देशही गणेशकर यांनी दिले होते.
जालना : अव्वाच्या सव्वा बिले
जालना शहरातील बहुतांश वीज ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील रीडिंग आणि वीजबिलावर आलेली रीडिंग यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते. या बद्दल दररोज वीज ग्राहक चुकीच्या मीटर रीडिंगच्या तक्रारी घेऊन जालन्यातील मस्तगड भागातील वीज वितरणच्या कार्यालयात गर्दी करत असल्याचे दिसून आले.