१८ गावांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:06 AM2020-01-19T01:06:10+5:302020-01-19T01:06:51+5:30
विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : विजेची देयके थकल्याचे कारण पुढे करत वीज वितरण कंपनीने अंबड तालुक्यातील १८ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांची मोठी अडचण होत आहे. तसेच शेतातील विहिरींमध्ये पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही.
या अठरा गावातील ग्रामस्थांकडे जवळपास ३३ लाख २७ हजार रुपयांचे वीजबिल थकले आहेत. त्यामुळे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी, नालेवाडी, रेणापुरी, चंदनापुरी खुर्द व बुद्रूक, भांबेरी, रामगव्हाण, टाका, दुनगाव, एकलहेरा, शहापूर, झोडेगाव, पाथरवाला खुर्द, दोदडगाव इ. गावांना पाणीपुरवठा करणा-या विहिरींचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीने वेळोवेळी ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही ग्रामपंचायतींनी विजेची देयके भरली नाहीत. त्यामुळे १६ जानेवारी रोजी सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना असतांना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, भांबेरी येथील सरपंच सहदेव भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामस्थांकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेत भरली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीनी वीज बिलासाठी निधी आणायचा कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
५० टक्के वीजबिल भरावे
यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एस.एस. हरकळ यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, वरिष्ठांकडून मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची वसुली करण्याच्या सूचना आहेत. ही थकबाकी भरावी म्हणून कल्पना दिली होती. ही बाब गंभीरतेने न घेतल्याने आम्हाला हा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा करण्यासाठी ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.