विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:05 AM2020-03-03T00:05:49+5:302020-03-03T00:06:27+5:30

जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Preparation meeting for Vidrohi sahitya sammelan | विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी

विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द साहित्यिक आणि समीक्षक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. येथील शीतल गार्डनमध्ये हे संमेलन होणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संमेलनाविषयी माहिती देताना कार्यकारी संघटक किशोर ढमाले म्हणाले, परिवर्तनवादी चळवळीला गती देण्यासाठी या विद्रोही संमेलनाचे आयोजन गत पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात केले जाते. मराठवाड्यातील हे चौथे साहित्य संमेलन आहे. लोकवर्गणीतून या संमेलनाचे आयोजन केले जाते. शासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख अनुदान देत असले तरी तेथे केवळ भोजनावळी होतात, असा आरोपही ढमाले यांनी केला. या संमेलनात पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करून अन्याय- अत्याचाराला या संमेलनातून वाचा फोडली जाते. या संमेलनात आदिवासी समूहाला प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे सांस्कृतिक आणि पारंपरिक नृत्य हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
१४ मार्च रोजी ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. यात कवीसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद, गटचर्चा यासह अन्य प्रमुख कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ अधिकाधिक सक्षम व्हावी, या हेतूने आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने या संमेलनास भरभरून प्रतिसाद दिला आहे. जालना येथील संमेलनही असेच ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनास महाराष्ट्रातून दोन हजार साहित्यप्रेमी उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांच्या निवास, भोजन आणि अन्य विषयांसंदर्भातील काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राम गायकवाड यांनी या संमेलनाच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. संमेलनाध्यक्ष पाटील यांचा विविाध ठिकाणी नागरी सत्कार करण्यात येणार असून, जालन्यात १३ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनात स्थानिक कवींसाठी स्वतंत्र संमेलन होणार आहे. बालमंच हे या संमेलनाचे स्वतंत्र दालन राहणार आहे. पथनाट्याच्या माध्यमातून ८ मार्च रोजी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जालन्यातील साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, कार्यवाहक राजेश ओ. राऊत, स्वागताध्यक्ष विजय पंडित, बुलडाणा येथील प्रा. पी. एस. खिल्लारे, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तणपुरे, राजू घुले आदींची उपस्थिती होती.
आज देशात केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे चुकीचे निर्णय घेऊन ते लादले जात आहेत. यावर सविस्तर मंथन या संमेलनात होणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे भोजनावळ्यांना येथे स्थान राहणार नाही. येथे विचारांचे मंथन होऊन समाजाला एकप्रकारची दिशा देण्याचे काम संमेलनातून आम्ही करणार असल्याचे किशोर ढमाले यांनी स्पष्ट केले.

Web Title: Preparation meeting for Vidrohi sahitya sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.