ओबीसी मोर्चाची तयारी पूर्ण : पारंपरिक वेशात येणार युवक-युवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:32 AM2021-01-23T04:32:17+5:302021-01-23T04:32:17+5:30
जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असंवैधानिक नॉन क्रिमिलिअरची अट रद्द झाली ...
जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असंवैधानिक नॉन क्रिमिलिअरची अट रद्द झाली पाहिजे, एससी, एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, बिंदूनामावलीची चौकशी करून नवीन बिंदूनामावली तयार करण्यासह महाज्योतील उपक्रमासाठी दोन हजार कोटी रूपयांची तरतूद करणे यासह अन्य मागण्यांसाठी रविवारी जालन्यात ओबीसी प्रवर्गातील नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र राख यांनी दिली. या मोर्चाच्या तयारीची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता निघणार आहे. हा मोर्चा कादराबाद, पाणीवेस, मस्तगड, गांधीचमन, शनी मंदिर, नतूर वसाहतमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चासाठी मंत्री विजय वडेवेट्टीवार, मंत्री संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार राजीव सातव, ज्येष्ठ नेते समीर भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भागवत कराड, खासदार विकास महात्मे, माजी मंत्री अतुल सावे, मुस्लिम समाजाचे ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, या मोर्चाच्या तयारीसाठी गेल्या महिन्याभरापासून ओबीसी समाजाचे सर्व ज्येष्ठ नेते तसेच युवक झटत आहेत. हा मोर्चा कोणालाही दुखावण्यासाठी अथवा शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नसून, घटनेने दिलेल्या नियमानुसार आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये, हाच यामागील हेतू असल्याचेही राख यांनी सांगितले. आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, ज्येष्ठ नेते लक्ष्मण वडले, माजी आमदार नारायण मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी यासाठीचे नियोजन करून सर्व ती मदत केली आहे. त्यामुळे हा मोर्चा निश्चितच लक्षवेधी ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला ओबीसी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक पांगारकर, राष्ट्रीय समाज पार्टीचे राज्य सचिव ओमप्रकाश चितळकर, नारायण चाळगे, बलुतेदार संघाचे राज्य अध्यक्ष कल्याण दळे, कपिल दहेकर, ॲड. संजय काळबांडे, सुनील खरे, अनिरूध्द चव्हाण, प्रा. सत्संग मुंडे आदी उपस्थित होते.
पारंपरिक वेशभूषेत येणार युवक-युवती
ओबीसी समाजाच्या मोर्चात अनेक युवक-युवती त्या-त्या समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. वंजारी, बंजारा, बारा बलुतेदार, माळी समाज आदींचा यात समावेश राहणार आहे. कोरोनाची सर्व ती काळजी घेऊनच हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी संयोजकांनी सांगितले.