मोसंबीचा दर ४० हजारांवर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:24 AM2018-02-10T00:24:56+5:302018-02-10T00:25:25+5:30
गतवर्षीचा अंबे बहर चांगला आल्याने मोसंबीचे उत्पादन दुपटीने वाढले आहे. बाजारात सुरुवातीलाच २० हजार रुपये प्रति टन दर मिळाला असून, तो ४० हजारांवर जाईल, असे व्यापा-यांनी सांगितले.
राजेश भिसे/जालना : गतवर्षीचा अंबे बहर चांगला आल्याने मोसंबीचे उत्पादन दुपटीने वाढले आहे. बाजारात सुरुवातीलाच २० हजार रुपये प्रति टन दर मिळाला असून, तो ४० हजारांवर जाईल, असे व्यापा-यांनी सांगितले.
जालना जिल्हा मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या पंधरा वर्षांत मोसंबीचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. २०१२ मध्ये दुष्काळामुळे जिल्ह्यातील बहुतांश बागा जळाल्या होत्या. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतक-यांचा आर्थिक कणा मोडला होता. यातून सावरायला या शेतक-यांना तीन ते चार वर्षे लागली. परिस्थिती सुधारत गेल्याने डाळींब आणि द्राक्षाप्रमाणेच मोसंबीचे लागवड क्षेत्रही वाढले. सध्या जिल्ह्यात जवळपास १७ हजार हेक्टर मोसंबीचे लागवड क्षेत्र होते. ते यंदा वाढण्याची शक्यता आहे. २०१६ चा अंबेबहर फारसा चांगला गेला नाही. परिणामी मोसंबीला दरही कमीच मिळाला. मात्र, गतवर्षी आॅगस्ट ते डिसेंबर या काळात असणारा अंबे बहर चांगला गेल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. बाजारात आवक वाढल्याने प्रतिटन २० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आगामी काही दिवसांत तो ४० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे. सध्या जालना बाजारात दररोज १५० टन मोसंबीची आवक सुरु आहे. ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
..............................
प्रक्रिया उद्योगामुळे मागणी वाढणार
नांदेड येथे मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे हे उद्योग असून, त्यांच्याकडूनही मोसंबीची मागणी असते. गतवर्षी त्यांनी दीड हजार टन मोसंबीची मागणी नोंदवली होती. जिल्ह्यात उत्पादन कमी झाल्याने या उद्योगांनी छत्तीसगड येथून मोसंबी मागवली होती. यावर्षी प्रक्रिया उद्योग वाढविण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.
......................................
कमी श्रमात अधिक उत्पन्न
जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या तुलनेत मोसंबी हे कमी श्रमात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते. यावर कुठलाही रोग न पडल्यास उत्पादन वाढते. गत काही वर्षात मोसंबीचे लागवड क्षेत्रही जवळपास तीन हजार हेक्टरने वाढले आहे.
..............................
हस्त बहरही चांगलाच जाणार
अंबेबहर दोन वर्षांच्या तुलनेत यंदा काही पटीने चांगला गेला. त्यामुळे जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन वाढले. जूननंतर येणा-या हस्त बहरमध्ये उत्पादन वाढविण्याची चिन्हे आहेत. ते वाढल्यास मोसंबी उत्पादन शेतक-यांना दरही अधिक मिळणार आहे.
- नाथा पाटील घनघाव, अध्यक्ष, मोसंबी अडतिया असोसिएशन, जालना.
....................................
गत दहा महिन्यांत तब्बल एक लाख टन मोसंबीची आवक जालना बाजार समितीत झालेली आहे. अंबे बहर चांगला गेल्याने जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे मार्चपर्यंत मोसंबीची आवक ही दीड लाख टनावर जाण्याची शक्यता आहे.
- गणेश चौगुले, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना.
...............................
द्राक्ष, डाळिंब आणि मोसंबी यासारख्या फळपिकांकडे वळण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जालना बाजार समितीकडून सर्व ती मदत शेतक-यांना केली जात आहे. यंदा मोसंबीचे उत्पादन वाढणार असल्याने दरही चांगले मिळत आहेत. यातून शेतक-यांना आर्थिक फायदा होऊ शकणार आहे.
- अर्जुन खोतकर, राज्यमंत्री तथा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना.