भाव पडले, अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी थेट गावात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 07:53 PM2023-03-15T19:53:27+5:302023-03-15T19:54:06+5:30
शेतमाल घरात आला की मालाचे भाव कमी होतात. त्यामुळे उत्पादन चांगले मिळूनही शेती तोट्यात येते.
भोकरदन : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आज चंक शेतकऱ्याच्या दारात गेले. त्यांच्या सोबत संवाद करून डॉ. राठोड यांनी अडचणी समजून घेतल्या. खचून जाऊ नका, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे मनोधेर्य वाढवले. जिल्हाधिकारी आपल्या दारात आल्यामुळे शेतकरी भारावून गेला होता.
शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे मनोधेर्य वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, गोषेगाव येथील परीक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी थेट सुरंगळी या गावात प्रवेश केला. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार सारिका कदम, तलाठी संदिप जुडे यावेळी त्यांच्या सोबत होते. त्यांनी दत्तात्रय श्यामा टोंपे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी भेट दिली.
डॉ. राठोड यांनी शेतकरी टोंपे यांची आपुलकीने विचारपूस केली. कुटुंबाची माहिती घेत जमीन किती आहे, काय पीक घेता, शेती परवडते का ? असे प्रश्न विचारले. यावर टोंपे यांनी शेतमाल घरात आला की मालाचे भाव कमी होतात. त्यामुळे उत्पादन चांगले मिळूनही शेती तोट्यात येते. साहेब, मालाचे भाव वाढवा, अल्पभूधारक शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर, ठिबक संच, तुषार संच द्यावे असे सांगितले.