चार दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:25 PM2020-02-24T23:25:17+5:302020-02-24T23:26:38+5:30
गावातील सहा रोहित्र जळल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मागील चार दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे रूग्णसेवेवर परिणाम होत आहे.
कुंभार पिंपळगाव : गावातील सहा रोहित्र जळल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मागील चार दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे रूग्णसेवेवर परिणाम होत आहे.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावला परिसरातील अनेक गावांचा संपर्क येतो. त्यामुळे गावात नेहमीच वर्दळ असते. येथे रूग्णांची संख्याही जास्त असते. परंतु, मागील काही दिवसांपासून रोहित्र जळाल्याने चार दिवसांपासून आरोग्य केंद्र अंधारात आहे. यामुळे कुटुंब नियोजनचा कॅम्प पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कुटुंब कल्याण नियोजन करणारे कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
वर्षाभरात चारशे ते पाचशे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. परंतु, विजेच्या समस्येमुळे सोमवारी होणारा कॅम्प पुढे ढकलण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी सांगितले. वीज नसल्यामुळे तिर्थपुरी आरोग्य केंद्रात रूग्णांना पाठवावे लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.