पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परतूर शहरामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:36 AM2019-10-16T00:36:58+5:302019-10-16T00:37:14+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी परतूर शहरात सभा होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी परतूर शहरात सभा होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या बंदोबस्तामुळे परतूर शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
परतूर येथे बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, गल्ली-बोळांसह घरांचीही तपासणी करण्यात येत आहे. तर घर मालक, दुकान मालकांना घोषणा पत्र देऊन अनोळखी व्यक्तींना प्रवेश देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. तसेच कडक बंदोबस्तही तैनात केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित सभा, हेलिपॅड परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार १० किलोमीटर परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार १० किलोमीटर अंतरावर ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाईट, एयरक्राफ्टस, प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स, पॅरामीटर व हॉट एअर बलून्स व तत्सम हवाई साधने उड्डाण- प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रम संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.