औद्योगिकसह कृषी उत्पादनांच्या निर्यात वाढीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:17+5:302021-09-25T04:32:17+5:30
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्रांच्या व्यवस्थापक के. सी. खरात यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यशाळेचे महत्त्व आणि निमित्त विशद ...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्रांच्या व्यवस्थापक के. सी. खरात यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यशाळेचे महत्त्व आणि निमित्त विशद केले. त्या म्हणाल्या की, भारताच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारने निर्यात वाढीला प्राधान्य देण्याचे ठरविले असून, त्यातून ग्रामीण भागातूनही ही निर्यात कशी वाढवावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हानिहाय निर्यातसंदर्भातील आराखडा तयार केला जात असल्याचे सांगून, लवकरच हा आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविणार असल्याचे खरात यांनी सांगितले. यावेळी उद्योजक सुनील रायठठ्ठा, समीर अग्रवाल यांनीही आयात आणि निर्यात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून मोठ्या संधी असल्याचे सांगितले.
चौकट
बँकांकडून निर्यातदारांसाठी अनेक योजना
या कार्यशाळेत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेशित मोघे यांनी सांगितले की, विविध बँकांकडून निर्यातदारांसाठी लेटर ऑफ क्रेडिट, ईएफसी यासह कमी व्याजदरात निर्यातदारांना कर्ज उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. कर्ज परतफेड हा महत्त्वाचा मुद्दा असून, सीबिलला मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. तसेच सबसिडीपुरतेच उद्योग सुरू करू नयेत.
प्रेशित मोघे, व्यवस्थापक अग्रणी बँक
चौकट
शहानिशा करूनच निर्यात करावी
आज निर्यातदारांना मोठी संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे निर्यात करताना येणाऱ्या अडचणी आणि धोके या विषयावर निर्यात तज्ज्ञ विश्वनाथ माळशेटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी परदेशात उत्पादन पाठविताना विमा महत्त्वाचा असल्याचे सांगून, त्याचे वेगवेगळे प्रकार असल्याचे सांगितले. तसेच परदेशातील व्यापाऱ्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, याबद्दल भारतातील निर्यातदारांनी अधिकची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कारखाना ते निर्यातदारापर्यंत वस्तूंची ने-आण करणे, तसेच ती वस्तू-मशीन तेथे कार्यान्वित करू देईपर्यंतची जबाबदारी आपली असते, त्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
- विश्वनाथ माळशेटे, निर्यात तज्ज्ञ ड्युराग्रुप