प्रियदर्शनी बँकेला रिझर्व्ह बँकेचे ३४ लाख रुपयांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:30 AM2020-12-31T04:30:35+5:302020-12-31T04:30:35+5:30
जालना : सामान्य माणसांची बँक हे ब्रिद घेऊन सुरू असलेल्या येथील प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेला मागील आर्थिक वर्षात जास्तीत- ...
जालना : सामान्य माणसांची बँक हे ब्रिद घेऊन सुरू असलेल्या येथील प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेला मागील आर्थिक वर्षात जास्तीत- जास्त सामान्य ग्राहकांना बँकेस जोडून कर्जवाटप केले. याची दखल घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विशेष बाब म्हणून प्रियदर्शनी बँकेला तब्बल ३४ लाख रुपयांचे बक्षीस (रिवॉर्ड) दिले आहे.
प्रियदर्शनी बँकेने जालना शहर आणि जिल्ह्यातील किमान सव्वालाख ग्राहक मोबाईल अॅपशी जोडलेले असून, या माध्यमातून अगदी लहान- मोठ्या, मध्यम अशा सर्वच स्तरातील गरजूवंतांना कमी रकमेचे कर्ज वाटप तसेच सामान्य लोकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या कार्याची दखल घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विशेष बाब म्हणून, प्रायारिटी सेक्टर सर्टफिकेट (पीएसएलसी) अंतर्गत बँकेस ३४ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत.
बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट बँक म्हणून या बँकेला पूर्वीच राज्य शासनाने पारितोषिक देऊन सन्मानित केलेले असून, बँकेच्या अन्य सर्व कामकाजाबद्दलही विविध पुरस्कार बँकेला मिळालेले आहेत. प्रियदर्शनी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. अॅड. विलासबापू खरात यांनी अगदी बँकेच्या स्थापनेपासूनच प्रियदर्शनी बँक ही सर्वसामान्य माणसाची बँक म्हणून नावलौकिक मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करुन त्या दृष्टीनेच बँकेचे कामकाज चालविले. बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप गर्जे आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाणी यांनी आपल्या कल्पक नेतृत्वातून बँकेची वाटचाल सुरू ठेवली. त्यातच विद्यमान चेअरमन सीए नितीन तोतला यांनीही बँकेच्या प्रगतीत मोलाची भर टाकल्यामुळे सातत्याने बँकेची यशस्वी घोडदौड सुरू राहिली.
प्रियदर्शनी बँकेला ३४ लाखांचे बक्षीस मिळाल्याबद्दल बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अॅड. विलासबापू खरात यांच्या हस्ते सचिन वाणी व सर्व बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.