शाब्दीक वादात पदोन्नती प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:05 AM2019-11-16T00:05:43+5:302019-11-16T00:06:25+5:30
वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नती देण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी येथील जेईएस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून मुलाखती घेण्यात आल्या. किरकोळ स्वरूपाची शाब्दीक चकमक वगळता मुलाखती शांततेत पार पडल्या.
जालना : वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नती देण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी येथील जेईएस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून मुलाखती घेण्यात आल्या. किरकोळ स्वरूपाची शाब्दीक चकमक वगळता मुलाखती शांततेत पार पडल्या. गेल्या तीन वर्षापासून बामुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने केलेल्या मागणीनुसार विद्यापीठ व्यवस्थापनाने त्या-त्या जिल्ह्यात जाऊन प्राध्यपकांच्या पदोन्नतीसाठी शिबरांचे आयोजन केले होते. . यावेळी काही प्राध्यापकांची कागदपत्र तसेच संस्था चालकांची अनुउपस्थितीचा मुद्या चांगलाच गाजला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येते. ही पदोन्नती देण्यासाठी विद्यापीठाच्या विविध विषयांच्या तज्ज्ञांचे पथक आज सकाळीच जालन्यात दाखल झाले होते. या पदोन्नतीच्या कार्यक्रमामूळे जेईएस महाविद्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.
यावेळी लेवल ११ आणि १२ तसेच १३ आणि १३-ए. अशा प्रकारच्या प्रवर्गात जे प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात येते. नुकताच शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे ही पदोन्नती मिळाल्यास प्राध्यापकांच्या वेतनातही चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे आजच्या या शिबिराला मोठे महत्व होते.
दरम्यान बदनापूर येथील महाविद्यालयातील काही पात्र प्राध्यापकांना प्राचार्य मुलाखतीस हजर असतांना तीन ते चार प्राध्यापकांना त्यांच्या सहीचे पत्र न मिळाल्याने अडचण होऊन नाराजी व्यक्त केली गेली.
संस्था चालकांच्या उपस्थितीचा अट्टाहास
यावेळी सहायक प्राध्यापकास १० मधून ११ मध्ये, ११ मधून १२ मध्ये पदोन्नती मिळते. तसेच असोसिएट प्रोफेसरसाठी १२ लेवलमधून १३ आणि १३-ए. अशी वर्गवारी ठरते. यामध्ये लेवल ११ आणि १२ साठी पदोन्नती देतांना या समितीचे अध्यक्ष हे प्राचार्य असतात.
तर १३ आणि १३-ए. यामध्ये पदोन्नती देण्यासाठी संस्थाचालक हे पदोन्नती देणाºया समितीचे अध्यक्ष असतात. पदोन्नतीसाठीच्या मुलाखतीवेळी संस्था चालकांनी उपस्थित राहणे बंधनकारक असते. जर ते नसतील तर त्यांच्या प्रतिनिधीची उपस्थिती गरजेची असते. परुंत आज झालेल्या मुलाखतीच्यावेळी अनेक संस्था चालकांना या-ना त्या कारणामुळे उपस्थित राहता आले नाही.
त्यामुळे त्यांनी पदोन्नती देण्यास अडचण नसल्याचे पत्र संबंधित पात्र प्राध्यापकांकडे दिले होते. परंतु पत्रा ऐवजी संस्था चालकांनाच उपस्थित करावे असा हट्ट धरण्यात आल्याने काहीकाळ वाद झाला. परंतु लगेचच उपस्थितांनी मध्यस्ती करून या वादावर पडदा टाकला.