श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूरला कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:41 AM2019-01-16T00:41:08+5:302019-01-16T00:42:15+5:30
वाटूर येथे सव्वा एकर परिसरावर उभारलेल्या अध्यात्मिक केंद्राचे लोकार्पण आणि नवीन इमारतीचे भूमिपूजन रविशंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, वाटूर येथे सव्वा एकर परिसरावर उभारलेल्या अध्यात्मिक केंद्राचे लोकार्पण आणि नवीन इमारतीचे भूमिपूजन रविशंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुढील महिन्यातील ७ आणि ८ तारखेस हे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी नैसर्गिक शेती तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सेंद्रीय शेती, जलसंधारण तसेच कौशल्य विकासाचे अनेक उपक्रम सुरू आहेत. स्वच्छ भारत योजनेतही पाच गावांमध्ये ३ हजार शौचालयांची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शंभू महादेव परिसरातील दहा गावांमध्ये ही कामे सुरू
आहेत.
त्यांच्या प्रेरणेतून अनेक लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, प्रत्येक गावात आर्ट आॅफ लिव्हिंगचे किमान पाच कार्यकर्ते निर्माण करण्याचे ध्येय असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेस डॉ. पुरूषोत्तम वायाळ, अंकुश भालेकर, सुनील अग्रवाल, संजय जेथलिया, संतोष तौर, अरूण मोहता, मदन कदम, रंगनाथ बोचरे, मधुकर वायाळ, राहुल जोशी, संजय कायंदे, अनिल खलसे, सुनील देशमुख, भानुदास डोंबोले, नीलेश खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.