जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची आस कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:55 AM2019-08-03T00:55:28+5:302019-08-03T00:55:50+5:30
जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आवश्यक तेवढा जलसाठा नसल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या आठवड्यात रिमझिम पावसाने खरिपांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये आवश्यक तेवढा जलसाठा नसल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणजे थेट वरुण राजाची कृपा हाच आहे. जिल्ह्यातील सात पैकी एक मध्यम आणि ३७ लघु प्रकल्प हे अद्यापही कोरडेठाक आहेत.
जालना जिल्ह्यात गेल्यावर्षी देखील सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळाची दाहता गंभीर स्वरूपाची होती. त्यातच पाणी टंचाईने देखील रौद्र रूप धारण केल्याने जवळपास यंदा ७०० पेक्षा अधिक टँकरने गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागला. यंदाही तशीच स्थिती कायम राहिली तर मोठे जल संकट निर्माण होऊ शकते. यंदाचा अर्धा पावसाळा संपला आहे. असे असतांना झालेल्या पावसाने केवळ पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु पाणीप्रश्न कायम आहे. जर चांगला पाऊस झाला नाही, तर यंदाही दुष्काळ राहू शकतो.
जालना जिल्ह्यात एकूण सात मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प आहेत. एक आॅगस्टला मोजलेल्या पाणी पातळीत मोठी गंभीर बाब समोर आली आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी एक तलाव कोरडा असून, चार तलावात जोत्याच्या पातळी खाली पाणीसाठा आहे.
४तर लघु तलावांपैकी ३९ तलाव कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ भोकरदन तालुक्यातील जुई आणि धामणा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले.