लागवडीबरोबरच वृक्षांचे संवर्धन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:18 AM2019-07-21T00:18:39+5:302019-07-21T00:18:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वृक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. आपले गाव, तालुका व जिल्हा हरित होण्याच्या दृष्टीकोनातून अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचा उपक्रम कल्पकतेने राबविण्याबरोबरच त्यांच्या संवर्धनासाठी यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देश वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी शनिवारी आढावा बैठकीत दिले.
खारगे यांच्या उपस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उप वनसंरक्षक सतीश वडसकर, वनसंरक्षक सामाजिक वनीकरण गुदगे, सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार, वनक्षेत्रपाल श्रीकांत इटलोड, प्रशांत वरुडे, सतीश बुरकुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खारगे म्हणाले, जालना जिल्ह्यास वृक्ष लागवडीचे देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्याबरोबरच वृक्ष लागवडीमध्ये लोकसहभाग वाढवावा. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लोकचळवळीत रुपांतरित होण्यासाठी लोकशिक्षण व प्रबोधन होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.
वृक्ष लागवड करताना शासकीय जमिनी, कार्यालयाच्या परिसरात उपलब्ध असलेली जागा त्याबरोबरच रस्त्यांच्या दुतर्फा अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याबरोबरच प्रत्येक शासकीय विभागाने आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या नागरिकांनाही वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत.
वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यातील उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना वृक्ष लागवडीसाठी मदतीच्या सूचनाही द्याव्यात, असेही विकास खारगे यांनी सांगितले.
उत्पादन शुल्क, कोषागार विभागाचे स्वागत
३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी अधिकची वृक्ष लागवड केल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भाग्यश्री जाधव तसेच जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली थोरात यांनी ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. इतर विभागांनी असे कार्य करण्याचे आवाहनही खारगेंनी केले.