मातृभूमीतील कौतुक आत्मबळ वाढविणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:14 AM2020-01-24T01:14:52+5:302020-01-24T01:17:51+5:30
मातृभूमित झालेला गौरव अधिक आत्मबळ वाढविणारा आहे. असे भावनिक प्रतिपादन सिने कलावंत कैलास वाघमारे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सोशल मीडियावरील विविध उपांगामुळे प्रत्येक जण केवळ स्वत: चे कौतुक करण्यातच मग्न झाला आहे. अशा परिस्थितीत निखळ मैञी जपून जालन्याच्या मातीत कौतुक करण्याचे मोठेपण दाखवले जाते. ही कलावंतांना प्रेरणा देणारी बाब असून मातृभूमित झालेला गौरव अधिक आत्मबळ वाढविणारा आहे. असे भावनिक प्रतिपादन सिने कलावंत कैलास वाघमारे यांनी आज येथे बोलतांना केले.
तान्हाजी चित्रपटातील चुलत्याची भूमिका यशस्वीरित्या साकारल्या बद्दल कैलास वाघमारे यांचा मित्र परिवारातर्फे गुरूवारी ( ता. २३) छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सत्कार करण्यात आला. अध्यक्ष स्थानी गोदावरी महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर होते. युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिमन्यू खोतकर, संयोजक जगदीश बारसे, अमोल ठाकूर, दिनेश भगत, आशीष रसाळ, नागेश बेनिवाल, नितीन वानखेडे, अनिल व्यवहारे, कैलास ईघारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बॉलीवुडमध्ये प्रचंड संघर्ष करत मातब्बर कलावंतांसोबत मिळालेल्या संधी चे कैलास वाघमारे यांनी सोने केले असून त्यांचे कष्ट व सुरू असलेली वाटचाल या बळावर ते चिञपट सृष्टीत देशभर नावलौकिक मिळवतील अशी अपेक्षा भास्कर अंबेकर यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक नेता उत्तम अभिनेता असतो. असे सांगून दिसण्यावर जावू नका असे ते म्हणाले.