‘वटेश्वर’ची ४० लाखांची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:28 AM2021-01-22T04:28:03+5:302021-01-22T04:28:03+5:30

दीपक ढोले जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या ...

Proposal to confiscate Vateshwar's property worth Rs 40 lakh | ‘वटेश्वर’ची ४० लाखांची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

‘वटेश्वर’ची ४० लाखांची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

Next

दीपक ढोले

जालना : जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून ३८ लोकांची १ करोड २३ लाखांची फसवणूक करणाऱ्या वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची ४० लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.

जालना येथील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने नागरिकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत २०१७ साली कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. फसवणूक झालेल्या सर्व लोकांना बोलवून विचारपूस केली. १ लाख रूपये घेऊन प्रत्येक महिन्याला १२ हजार रूपये देण्याचे आमिष वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने दाखविले असल्याचे यात निष्पन्न झाले. ३८ लाेकांची १ करोड २३ लाख रूपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले.

त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मालमत्तांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ४० लाख रूपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच याचा प्रस्ताव तयार करून मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संचालक मंडळाची आणखीही मालमत्ता असून, आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने त्याची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. याची चौकशी सउपपोनि. रवी जोशी, फुलसिंग घुसिंगे, मंगल लोणकर, रवी गायकवाड, निमा घनघाव, ज्ञानेश्वर खराडे आदी करत आहे.

जालना शहरातील वटेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने ३८ लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. सोसायटीची मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा आहे.

शालिनी नाईक, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

आर्थिक गुन्हे शाखेने केलेला प्रस्ताव बरोबर आहे की नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या प्रस्तावाची तपासणी केली जाते. यासाठी उपविभागीय अधिकारी, जालना व उपविभागीय अधिकारी, अंबड यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Proposal to confiscate Vateshwar's property worth Rs 40 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.