प्रस्तावित मनोरुग्णालय कोंडवाडा होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:10 AM2020-02-02T01:10:00+5:302020-02-02T01:11:21+5:30
जालना येथील प्रादेशिक मनोरुग्णालय कोंडवाडा न होता सुसज्ज उपचार केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाने जालना येथे २५० खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणीस मंजुरी दिली आहे. मात्र, देशात सुरू असलेल्या मनोरुग्णालयांच्या कामकाजावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आपणही रुग्णालयांतर्गत पाहिलेले कामकाजाचे अनुभव वाईट आहेत. त्यामुळे जालना येथील प्रादेशिक मनोरुग्णालय कोंडवाडा न होता सुसज्ज उपचार केंद्र व्हावे. मनोरुग्णांवरील उपचारानंतर पुढील उपचारासाठी गरजेची असलेली संलग्न केंद्रे सुरू व्हावीत, अशी अपेक्षा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी व्यक्त केले. जालना शहरात शनिवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. देव म्हणाले, मानसिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. राज्यात सुरू असलेल्या चार मनोरुग्णालयांपैकी तीन मनोरुग्णालये पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात तर एक मनोरुग्णालय नागपूर येथे आहे. मराठवाडा व परिसरातही अनेक मनोरूग्ण आहेत. मात्र, त्यांच्यासाठी रूग्णालय नाही. विशेष म्हणजे, जालना येथे पूर्वी मनोरुग्णालय सुरू होते. मात्र, शासनाने १९५३ मध्ये ते हैदराबादला हलविले. येरवाडा रूग्णालयापेक्षा ८ वर्षे जुने हे रुग्णालय होते. मात्र, जालना येथे मनोरुग्णालय असल्याची नोंद शासकीय दप्तरी नव्हती. आपण आभ्यास करून जालना येथे मनोरुग्णालय असल्याचे समोर आणले आहे. केलेल्या अभ्यासाची माहिती आॅनलाईन प्रसिध्द करण्यात आली होती.
शासन जालना येथे मनोरुग्णालय सुरू करीत असताना इतिहासातील चुकांची दुरूस्ती करण्यासाठी आपल्या बीजभूत प्रयत्नांची नोंद शासनाने घेऊन इतिहासाची दुरूस्ती करावी, अशी मागणी डॉ. देव यांनी केली. शिवाय मनोरुग्णालयांतर्गत चालणारे कामकाज आपण जवळून पाहिले आहे. त्यामुळे जालना येथे सुरू होणारे मनोरूग्णालय कोंडवाडा न होता सोयी-सुविधांनी सज्ज असे उपचार केंद्र व्हावे. मनोरुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना थेट समाजात वावरू देता येत नाही. उपचारानंतर करावयाच्या उपचाराची केंद्रे या मनोरुग्णालयाला संलग्नित करून ती सुरू करावीत, विशेषत: बाल मनोरुग्णालयही सुरू करावे, अशी मागणीही डॉ. देव यांनी केली. मनोरुग्णालयासोबत इतर केंद्रे सुरू झाली तर त्याची मदत होऊ शकते.
मोबाईल व्हॅनद्वारे जागृती करावी
बुवाबाजी, धार्मिक स्थळांमधील उपचार, तांत्रिक- मांत्रिक अशा अंधश्रध्दात्मक उपचार पध्दतीवर आळा घालण्यासाठी जागृती व्हावी म्हणून शासनाने मनोरुग्णालयांतर्गत एक मोबाईल व्हॅन सेवा सुरू करावी. या मोबाईल व्हॅनद्वारे धार्मिक स्थळ परिसरात जाऊन जागृती करीत अंधश्रध्दात्मक उपचार पध्दतीला पायबंद घालावा, अशी मागणीही डॉ. डॉ. नीरज देव यांनी केली.