समृध्दी महामार्ग: आरोपींना पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:23 AM2019-05-17T01:23:22+5:302019-05-17T01:23:42+5:30
अंबड येथे एका महिलेच्या नावाने जीपीओ कुलमुख्त्यार पत्र तयार करणाऱ्यासह दोन साक्षीदारांना कदीम पोलिसांनी अटक केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई ते नागपूर हा समृध्दी महामार्ग जालन्यातून जात आहे. तो जिल्ह्यातील २५ गावातून जात असून, यासाठी जमीन संपादन करताना अनेक ठिकाणी भूखंड घोटाळा झाला होता.या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यात तथ्य असल्याचे आता समोर आले असून, यात अंबड येथे एका महिलेच्या नावाने जीपीओ कुलमुख्त्यार पत्र तयार करणाऱ्यासह दोन साक्षीदारांना कदीम पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील गट क्रमांक ४१ मधील चार एकर जमीन समृध्दी महामार्गात संपादित झाली आहे. या जमिनीचा ६३ लाख रूपयांचा मावेजा परस्पर लाटण्यासाठी संशयित लालखाँ शेरखान (रा. लालबाग जालना), शेरू अफसरखाँ आणि शेख अलीम शेख करीम यांना कदीम जालना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. मिमरोट यांनी सांगितले.
यासह अन्य प्रकरणांमध्येही समृद्धी महामार्गाची जमीन संपादित करताना घोटाळा झाला असल्याच्या तक्रारी आहेत.
मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागेना
या प्रकरणातील आणखी एक संशयित मुख्य आरोपी मोहंमद यासीन इंद्रीस हा अद्याप फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही कसून शोध घेतल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी शरीफा बेगम अब्दुल गनी (वय ८०) या नावाने तोतया महिला उभी करून अंबड येथील रजिस्ट्री कार्यालयात जीपीओ तयार करण्यात आल्याचे दिसून आले.
हा जीपीओ करून पानशेंद्रा येथील चार एकर जमिनीचा ६३ लाख रूपयांचा मावेजा लाटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.