इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत; मनोज जरांगेंनी शासनाला दिली रात्रीपर्यंतची वेळ
By विजय मुंडे | Published: November 1, 2023 12:13 PM2023-11-01T12:13:58+5:302023-11-01T12:15:37+5:30
दाेषींना सोडून शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना विनाकारण उचलू नका.
अंतरवाली सराटी (जि.जालना) : इंटरनेट बंद केल्याने हजारो युवकांनी रात्रभर इथं खडा पहारा दिला. इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. शासनाने आज रात्रीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी बुधवारी सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले शांततेचे आंदोलन आता मोठे झाले आहे. त्यामुळे ते आंदोलन दडपण्याचा शासनाचा डाव असू शकतो. मी इथून उठणार नाही आणि ते मला उठवू शकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दुसऱ्या वेळेस बैठक बोलाविली आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविणार की नाही, देणार तर किती दिवसात देणार ही भूमिका स्पष्ट करावी. शासनाने आज भूमिका स्पष्ट केली नाही तर रात्रीपासून पुन्हा पाणी पिणे बंद करणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विनाकारण मुलांना उचलू नका
बीड, केजमध्ये शांततेत साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरू आहे. दाेषींना सोडून शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना विनाकारण उचलू नका. ज्यांना उचलले त्यांना सोडल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, तसे झाले नाही तर आपण बीडचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक मुलांवर कसा अन्याय करतात ते पाहू असेही ते म्हणाले.
नितेश राणे यांनी बोलू नये
एकीकडे नितेश राणे मला फोन करून गोडगोड बोलतात तर तिकडे दुसरे बोलतात. आता त्यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही आणि नितेश राणे यांनीही इथून पुढे बोलू नये. माझा बोलाविता धनी कोण हे प्रसाद लाड यांना भेटल्यावर सांगतो, असेही जरांगे पाटील म्हणाले.