हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या- राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:30 AM2019-11-06T00:30:55+5:302019-11-06T00:31:18+5:30
परतीच्या पावसामुळे केदारखेडा शिवारातील कोल्हापुरी शिवारातील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून, शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजू शेट्टी यांनी मंगळवारी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : परतीच्या पावसामुळे शेतातील पिके वाहून गेली असून, नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांना ५० हजत्तर रुपये हेक्टरी मदत द्यावी नसता त्याचे परिणाम भोगावेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
परतीच्या पावसामुळे केदारखेडा शिवारातील कोल्हापुरी शिवारातील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून, शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजू शेट्टी यांनी मंगळवारी पाहणी केली. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. प्रशासनाने काही दखल घेतली का ? अशी विचारणा केली. महसूल अधिकारी फिरकलेच नसल्याचे व मदतीसंदर्भात कोणी ‘ब्र’ शब्द काढत नाही, असे ग-हाणे शेतक-यांनी माडंले. त्यावर शेट्टी यांनी प्रशासनाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले. शेतक-यांवर अन्याय होत असेल तर आम्ही कदापी गप्प बसणार नाही. शेतक-यांनी चिंता करु नये, असेही ते म्हणाले. शेट्टी यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संर्पक साधला. मात्र, जिल्हाधिकारी बाहेर असल्यामुळे चर्चा झाली नाही. त्यानंतर उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून शेतक-यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी हजर होते. यावेळी स्थानिक अधिका-यांकडूनही शेट्टी यांनी माहिती जाणून घेतली.
निद्रिस्त सरकार : सर्वांना मदत मिळावी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी मंगळवारी जालन्यात काही काळ थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला होता, तर आता त्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. शेतक-यांवरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाही.
असे असले तरी सरकार केवळ कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शेतकरी हलवादिल झाला असताना केवळ दौरे करून त्याला दिलासा दिला जात आहे. अद्याप शिवसेना आणि भाजपने सरकार स्थापनेचा दावाही केला नाही तर विरोधकांनी पुढे येण्याची गरजही शेट्टी यांनी वर्तविली. यावेळी त्यांच्यासमवेत साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी या पदाधिका-यांची उपस्थिती होती.
याविषयी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव यांनी सागिंतले की, अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहमुळे बंधाºयाचे पाणी एका बाजूने जाऊन जमिनी वाहिल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती म्हणून ही घटना दुर्दैवी आहे. तरी सुद्धा शेतक-यांना मदतीसाठी तात्काळ पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेला आहे.