शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:45 PM2020-03-12T23:45:52+5:302020-03-12T23:48:07+5:30
कार्यक्षेत्राबाहेरील परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने जवळपास ६५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कार्यक्षेत्राबाहेरील परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने जवळपास ६५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यांतर्गत १२६ शेतकºयांकडील २९ लाख रूपयांचे परवानाधारक सावकारांचे कर्ज माफ होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
शासनाच्या नोव्हेंबर २०१४ च्या परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजनेत जालना जिल्ह्यातील १२४३ शेतक-यांचे १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले होते. मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. शेतक-यांकडून होणारी मागणी पाहता शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांनाही योजनेचा लाभ देण्याची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील समित्यांनी परवानाधारक सावकारांचे दप्तर तपासण्यात आले होते. मध्यंतरीच्या कालावधीत हजारो शेतक-यांनी सावकारांचे कर्ज फेडले. त्यामुळे सहा परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले १२६ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून, संबंधित शेतक-यांकडे असलेले २९ लाख १ हजार ३१८ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर आता शासनाने अर्थसंकल्पातच मराठवाडा, विदर्भासाठी जवळपास ६५ कोटी रूपयांची तरतूद केल्याने सावकारांकडील कर्ज असलेले १२६ शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत.
जालना, जाफराबाद तालुक्यातील लाभार्थी आणि रक्कम
जालना तालुक्यातील १०९ शेतक-यांचे ७ लाख ७५ हजार ५५० रूपये मुद्दल, ६ लाख २७ हजार ३१० रूपये व्याज. जिल्हा समितीच्या बैठकीपर्यंतचे ११ हजार ६६५ रूपये व्याज असे एकूण १४ लाख १४ हजार ५२५ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.
जाफराबाद तालुक्यातील १७ शेतक-यांचे ९ लाख रूपये मुद्दल, ५ लाख ६८ हजार ७४४ रूपये व्याज, जिल्हा समितीच्या बैठकीपर्यंतचे १८ हजार ४९ रूपये व्याज असे एकूण १४ लाख लाख ८६ हजार ७९३ रूपये कर्ज माफ होणार आहे. जालना व जाफराबाद तालुक्यातील सावकारांचे शेतक-यांकडे असलेले एकूण २९ लाख १ हजार ३१८ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.