उत्तम आरोग्यासाठी भरीव निधीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:30 AM2019-06-08T00:30:53+5:302019-06-08T00:31:13+5:30
आणखी एक शंभर खाटांचे अद्ययावत नवीन रुग्णालय उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांची मान्यता दिली असून, त्यातील ४ कोटी रुपये प्राप्त झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील गांधी चमन स्थित महिला व बाल रुग्णालयास शंभर खाटांची मान्यता मिळाली असून, त्यासाठी लागणारे अतिरिक्त ४१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे, तर आणखी एक शंभर खाटांचे अद्ययावत नवीन रुग्णालय उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांची मान्यता दिली असून, त्यातील ४ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.
शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत खोतकर यांनी माहिती देताना सांगितले की, गांधीचमन येथील महिला व बाल रुग्णालयात शंभर खाटा व्हाव्यात, अशी इच्छा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली होती.
त्याचा पाठपुरावा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला होता. त्या संदर्भात मंत्रालयीन पातळीवर तीन बैठकाही घेण्यात आल्या. या बैठका घेतल्यानंतर त्या संदर्भात राज्य सरकारने हे निर्णय घेतल्याचे खोतकर म्हणाले.
यामध्ये गगांधीचमन येथील महिला व बाल रुग्णालयात पूर्वी वैद्यकीय तसेच अन्य कर्मचा-यांची संख्या ५१ होती. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार सेवा देताना अडचण येत होत्या.
ही बाब लक्षात घेवून आता ४१ अतिरिक्त पदांना मंजुरी मिळाली आहे. तर नवीन शंभर खाटांचे रुग्णालय देखिल मंजूर झाले असून, त्यासाठी तीस कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यापैकी ४ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, पंडित भुतेकर, भाऊसाहेब पाऊलबुद्धे आदींची उपस्थिती होती.
जालना : एमबीबीएस महाविद्यालयाचा प्रस्ताव
जालना येथील शासकीय रुग्णालयामध्ये महिला तसेच जिल्हा रुग्णालय मिळून ५०० खाटा उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जालन्यात एमबीबीएस महाविद्यालय सुरू व्हावे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो अद्याप मंजूर झाला नसला तरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यात पुढाकार घेतल्यास त्याच्या मंजुरीला गती मिळू शकते.
- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक