जनता-जनार्दन हेच माझे दैवत- रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:04 AM2019-06-09T00:04:31+5:302019-06-09T00:08:51+5:30

पक्षभेदासह सुडाचे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी खेचून आणू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

Public is my only God - Ravsaheb Danwe | जनता-जनार्दन हेच माझे दैवत- रावसाहेब दानवे

जनता-जनार्दन हेच माझे दैवत- रावसाहेब दानवे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आपण निवडून येण्यामागे कुठल्या गुरू अथवा देवाची साथ आहे, असे नसून, आपण कायम जनतेत राहून त्यांच्या सुख - दु:खाशी समरस होतो, त्यामुळेच आपण विजयी होत आलो आहोत. जनतेचे हे उपकार आपण कधीही विसरणार नाही. निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार होतो, परंतु आता मी देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहे. त्यामुळे मी पक्षभेदासह सुडाचे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी खेचून आणू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
दानवेंच्या शनिवारी सर्वपक्षीय सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. विलास खरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जालना पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, नगरसेवक भास्कर दानवे, सुधाकर जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, ज्यावेळी भाजपचे केवळ दोन खासदार होते, त्यावेळी तत्कालीन खा. दिवंगत बाळासाहेब पवार यांनी आपल्याला काँग्रेसमध्ये येण्याची गळ घातली. तुमच्या पक्षाचे दोनच खासदार आहेत, त्यामुळे तेथे भविष्य नाही असे त्यांनी समजावून सांगितले. परंतु आपण पक्षनिष्ठा कायम ठेवल्यानेच आज येथपर्यंत पोहोचलो आहोत. यंदाच्या निवडणुकीत तर ऐन प्रचाराच्यावेळी आपण १२ दिवस आजारी असल्याने रूग्णालयात होतो. परंतु तरीही पक्षबांधणीची ताकद आणि मतदारांवरील विश्वासामुळेच आपला एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय झाला. या विजयाची खात्री आपल्याला होती, असेही दानवे म्हणाले.
दरम्यान आगामी काळात पूर्वीप्रमाणेच जालन्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी आपण बांधील आहोत.
सुडाचे राजकारण न करता, आपण सर्व पक्षांचे म्हणणे जिल्ह्याच्या विकासासाठी ऐकून तसे काम करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून सहा हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगून आयसीटी, ड्रायपोर्ट, डीमआयसी, समृध्द महामार्ग जालना ते वडीगोद्री हा ३४० कोटींचा रस्ता तयार केला. अशी अनेक उदाहरणे देता येतील असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी दानवेंच्या मंत्रिमंडळ समावेशाने जालन्याला देशाच्या सत्तेत वाटा मिळाला आहे. त्यामुळे मराठवाड्याचा अनुशेष दूर होऊन जालना जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागण्यास दानवेंची मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश भोसले आणि संजय देठे यांनी केले. आभार देविदास देशमुख यांनी मानले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
खोतकरांसोबतचा वाद हे नाटक
मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी शड्डू ठोकून मोठे आव्हान उभे केले होते. परंतु खोतकरांनी निवडणूक लढवू नये म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात दोन महिन्यांपूर्वीच समेट झाला होता. नंतर जे काही झाले, ते एक नाटक होते, असे सांगून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा झटका दिल्याने सभागृहात हशा पिकला.

Web Title: Public is my only God - Ravsaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.