प्राप्तीकर विभागातर्फे जनसंपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:50 PM2020-03-12T23:50:06+5:302020-03-12T23:50:42+5:30
: व्यापारी, उद्योजकांनी प्रामाणिकपणे प्राप्तीकराचा भरणा करावा म्हणून या विभागातर्फे दोन दिवसांपूर्वी येथील कलश सीडस् मध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : व्यापारी, उद्योजकांनी प्रामाणिकपणे प्राप्तीकराचा भरणा करावा म्हणून या विभागातर्फे दोन दिवसांपूर्वी येथील कलश सीडस् मध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापारी, उद्योजक आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच, गोपाल अग्रवाल, बैजल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हस्तिमल बंब, प्राप्तीकर विभागाचे आयुक्त अचल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत सतीश पंच यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशाच्या विकासासाठी व्यापारी आणि नोकरदारांनी प्रामाणिकपणे कर भरला पाहिजे. परंतु, प्राप्तीकर विभागानेही व्यापाऱ्यांकडे शंकेच्या दृष्टीने न पाहता परस्पर विश्वास ठेवला पाहिजे. मध्यंतरी हा व्यापारी आणि विभागातील वाद टाळण्यासाठी ‘विवाद से विश्वास’ असे घोषवाक्य प्राप्तकर विभागाने अर्थात अर्थ मंत्रालयाकडून घोषित करण्यात आले होते. या घोषवाक्यानुसार सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून कर संकलन वाढविण्याचे आवाहन पंच यांनी केले.
कार्यक्रमात अतिरिक्त आयकर आयुक्त अचल शर्मा यांनी कर प्रणालीमध्ये झालेल्या नवीन बदलांची माहिती देऊन सर्वांसाठी सुलभ कर प्रणाली तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास प्राप्तीकर विभागातील अधिकारी रूपेश शेवाळे, आशिष सिंग, मनोज करलगीकर, शकील खान, व्ही.ए.फ बहुरे, सचिन इक्कर, विश्वजित, विवेकसिंग आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आशिष सिंगला यांनी केले.