जालना जिल्ह्यातून ५८ लाख रूपयांची कोष खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:05 AM2018-06-01T01:05:17+5:302018-06-01T01:05:17+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीमकोष खरेदी बाजारपेठेत सव्वा महिन्यात ५० क्विंटल रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीमकोष खरेदी बाजारपेठेत सव्वा महिन्यात ५० क्विंटल रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे सध्या बाजारपेठेत कोषाची आवक थंडावली आहे.
मराठवाड्यासह राज्यातील रेशीम विकासाला चालना मिळावी या उद्देशाने पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत रेशीम कोष खरेदी केंद्र मराठवाड्यात व्हावे यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला. शासनाने जालना येथे रेशीम बाजारपेठ खरेदी केंद्राला मान्यता दिल्यावर २१ एप्रिल रोजी या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. पूर्वी शेतकऱ्यांना रेशीमकोष विक्रीसाठी कर्नाटक राज्यातील रामनगरम् येथे जावे लागत होते. रेशीमकोष उत्पादन करणा-या शेतक-यांना फायदा व्हावा यासाठी बाजार समिती परिसरात रेशीमकोष बाजारपेठ सुरू करण्यात आल्याचे राज्यमंत्री खोतकर म्हणाले. बाजारपेठे सुरू होऊन सव्वा महिना झाला आहे. ३१ मे पर्यत ५८ लाख ६० हजार रूपयांचे ५० क्विंटल रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे सध्या बाजारात रेशीमकोषाची आवक मंदावली आहे. जिल्ह्यात सुमारे ७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रेशीम शेती करण्यात येत आहे. कमी वेळात आणि कमी पाण्यात जास्त पैसे देणारे पिक असल्याने बहुतांश शेतक-यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीस प्राधान्य देत आहेत.
लवकरच : सिरसवाडीत रेशीमकोष केंद्र
जिल्ह्यात तुती लागवडीचे प्रमाण वाढत आहे. ७ हजार हेक्टरपेंक्षा जास्त क्षेत्रावर रेशीमची शेती होत आहे. शेतक-यांची गैरसोय दूर व्हावी याच उद्देशाने येथील कृषी बाजार समिती परिसरात प्रायोगिक तत्वावर बाजारपेठ सुरू करण्यात आली. यासाठी शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी दिला आहे. सध्या उन्हामुळे रेशीम पंूज तयार होण्यास अडचणी येत असल्याने बाजारात कोषाची आवक घटली आहे. जून ते आॅगस्ट महिन्यात रेशीम कोषाची बाजार पेठेत आवक वाढले. सिरसवाडी शिवारात लवकरच रेशीमकोष बाजारपेठेची सुसज्ज इमारत तयार करण्यात येणार आहे. याला एक वर्ष लागणार असल्याचे रेशीम विभागाचे सहाय्यक संचालक दिलीप हाके यांनी सांगितले.