दहा क्विंटल रेशीमकोषाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:14 AM2018-05-04T01:14:34+5:302018-05-04T01:14:34+5:30
बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीमकोष खरेदी केंद्रात गुरुवारी २९ शेतकऱ्यांकडून १० क्विंटल रेशीमकोषची खरेदी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीमकोष खरेदी केंद्रात गुरुवारी २९ शेतकऱ्यांकडून १० क्विंटल रेशीमकोषची खरेदी करण्यात आली. रेशीमकोषाला गुणवत्तेनुसार भाव देण्यात येत असल्याने मराठवाड्यातील हिंगोली, परभणीसह पालघर येथील शेतक-यांनी रेशीमकोश विक्रीस आणला होतो.
जिल्ह्यात गत चार वर्षात तुत लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. २०१२ पासून यात चांगली वाढ झाली आहे. मात्र रेशीमकोष विक्रीसाठी जिल्ह्यात बाजारपेठच नसल्याने शेतक-यांची चांगलीच गैरसोय होत होती. शेतक-यांना कर्नाटकातील रामनगरम येथे कोष विक्रीसाठी न्यावा लागत होता. मात्र ने-आण करण्याचा खर्च बघता शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. जालना कृषी उत्पन्न बाजारपेठेत राज्यातील पहिली रेशीमकोष विक्री केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतक-यांची होणारी गैरसोय दूर झाली. उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. परराज्यात भाषेच्या अडचणीमुळे शेतक-यांची सुध्दा चांगलीच गैरसोय होत होती. विक्री केंद्र सुरु झाल्याने गुरूवारी जालना जिल्ह्यातील घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, बीड, परभणी, हिंगोली आदीसह पालघर जिल्ह्यातील २० शेतक-यांनी १० क्विंटल रेशीमकोश विक्रीस आणला होता.
अपेक्षेनुसार भाव द्यावा अशी मागणी पालघर येथील दशरथ डोके, राहुल साठे, विवेक चौधरी, सतीश टाळे आदींनी केली.