प्रा. छबुराव भांडवलकर यांच्या ‘हुरहूर’ कथासंग्रहाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:57+5:302021-03-04T04:57:57+5:30
येथील स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात सोमवारी प्रा. छबुराव भांडवलकर यांच्या ‘हुरहूर’ कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. दिरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
येथील स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात सोमवारी प्रा. छबुराव भांडवलकर यांच्या ‘हुरहूर’ कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. दिरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्रा. डॉ. सदाशिव कमळकर, प्रा. प्रदीप देशमुख, लेखक भांडवलकर, लक्ष्मीबाई भांडवलकर, डॉ. धोंडोपंत मानवतकर यांची उपस्थिती होती. डॉ. दिरंगे म्हणाले, घरातील टीव्ही आणि हातातील मोबाईल यामुळे वाचनसंस्कृतीला खीळ बसली असून, ग्रामीण साहित्याच्या निर्मितीची प्रक्रिया थंडावली आहे. अशा परिस्थितीत भांडवलकर यांचा कथासंग्रह अस्सल ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारा वाटतो. प्रा. कमळकर म्हणाले, ग्रामीण जीवनाचे वास्तव भांडवलकर यांच्या प्रत्येक कलाकृतीतून व्यक्त होताना दिसते. त्यांच्या उमणी, थेट सरपंच या कादंबरीतून ग्रामीण भागातील समाजकारण आणि राजकारण प्रभावीपणे चित्रित झाले असून ‘उभारी’सारख्या कादंबरीतून त्यांनी ग्राम संस्कृतीत जगणाऱ्या माणसाचा आशावाद मांडला आहे. हुरहूर कथासंग्रहावर भाष्य करताना प्रा. प्रदीप देशमुख म्हणाले की, हा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील बकाल अवस्था मांडणारा दस्तऐवज आहे. दुष्काळ, स्थलांतर, व्यसनाधीनता आणि एकूण सामाजिक व राजकीय स्थित्यंतराचे ग्रामीण जीवनावर होणारे परिणाम शब्दबद्ध झाले आहेत. त्यांच्या कथेतील पात्रे सर्वसामान्य शेतकरी आणि वंचित वर्गातील असून, त्यांच्या वाट्याला आलेली परवड अधोरेखित करणारी आहेत.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. भारत खंदारे म्हणाले की, आज नेटवर्किंगने आपले संपूर्ण जीवन व्यापून टाकले असून, याचा परिणाम संपूर्ण समाज घटकावर होत आहे. कथासंग्रहातून अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन होत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी निशिगंधा मानवतकर हिचा एम. जे. परीक्षेत विशेष प्राविण्याबद्दल अविष्कार साहित्य मंडळाकडून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पांडुरंग नवल यांनी केले. डॉ. धोंडोपंत मानवतकर यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य अंकुशराव मोरे, प्रा. यशवंत दुबाले, प्रा. डॉ. बापू सरवदे, प्रा. अशोक खरात, प्रा. चारुलता पाटील, कथाकार शिरीष देशमुख, डॉ. गोपाल तुपकर, डॉ. संतोष मोरे, शिवाजी जाधव, ओ. बी. राठोड यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्य रसिकांची उपस्थिती होती.
===Photopath===
020321\02jan_5_02032021_15.jpg
===Caption===
प्रा. छबुराव भांडवलकर यांच्या ‘हुरहुर’ कथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी मान्यवर.