भोकरदन नगर पालिकेत हमरीतुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:45 AM2018-03-09T00:45:37+5:302018-03-09T00:45:41+5:30
भोकरदन येथील नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व नगरसेविकेच्या पतीमध्ये पाणीपुरवठ्याच्या बिलावरून गुरुवारी कार्यालयातच जोरदार बाचाबाची झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व नगरसेविकेच्या पतीमध्ये पाणीपुरवठ्याच्या बिलावरून गुरुवारी कार्यालयातच जोरदार बाचाबाची झाली. उपस्थितांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद निवळला.
नगरपरिषदेत गरुवारी जागतिक महिला दिनानिमित्त मेळावा घेण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिध्दीकी, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नगरसेवक राजाभाऊ देशमुख, शेख कदीर, रणवीरसिंह देशमुख, नसीमखॉ पठाण, नगरसेविकेचे पती शेख जफर यांच्यासह अन्य सदस्य पाणीपुरवठ्याबाबत चर्चा सुरू अतसना उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन यांनी पाणीपुरवठा विहिरींचे बिल देऊ नये, असे सांगितले. तर नगरसेविका फरजानाबी शेख यांचे पती शेख जफर यांनी बिल द्यावे लागले, असे सांगितले. उपनगराध्यक्षांना हे खटकले. त्यांनी मुख्याधिकाºयांना जाब विचारला. त्यावेळी शेख जफर यांनी ‘नगर परिषद क्या तुम्हारे बाप की है क्या’ कुणीही या कार्यालयात येऊ शकते, असे सुनावले. यावरून उपनगराध्यक्ष व नगरसेविकेच्या पतीमध्ये चांगलीच जुंपली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून उपस्थितांनी मध्यस्थी केली. विशेष म्हणजे दोन्ही पदाधिकारी एकाच पक्षाचे आहेत.