मूल्यमापनाच्या संथगतीमुळे दहावीच्या निकालावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:54+5:302021-06-30T04:19:54+5:30
जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार ...
जालना : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरी अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यात जवळपास ३२ हजारांपेक्षा अधिक मुले-मुली दहावीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले असते. परंतु, यावेळी शासनाने कोरोना संसर्गामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच जाहीर केला. परीक्षेमुळे गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन परीक्षा रद्द केल्याने सर्वत्र स्वागत होत आहे. असे असले तरी यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना शाळा पातळीवर अनेक अडचणी येत आहेत.
जालना जिल्ह्यात बहुतांश शाळांमध्ये दहावीचा निकाल ठरविण्यासाठी मूल्यमापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
असे असताना या मूल्यमापन समितीत तोंडी आणि लेखी परीक्षा घेताना अडचणी आल्या आहेत. काही ठिकाणी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या.
एकीकडे प्रात्यक्षिक परीक्षांची अडचण यंदाही कायम आहे. कला, क्रीडा क्षेत्राचे गुणदान करतानाही शिक्षकांसमोर अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
सरकारचा निर्णय महत्त्वाचा
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावीसोबतच बारावी परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्यासाठी मूल्यमापन करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार शिक्षकांना सूचना दिल्या आहेत.
- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी
मूल्यमापनानुसारच गुणदान
मूल्यमापन समिती प्रत्येक शाळेमध्ये स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून इयत्ता नववी आणि दहावी अशा दोन्ही वर्गातील त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचे अवलोकन केले जात आहे. यातून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार आहे.
- ज्ञानेश्वर टेकाळे, शिक्षक
मूल्यमापनाचे नियम सरकारने निश्चित केले आहे. असे असले तरी एकूणच वेगवेगळे विषय आणि विशेष करून गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांना किती गुण द्यावे याचे सूत्र ठरले आहे. यातून विद्यार्थ्यांचे हित जपण्यावर भर दिला जात आहे.
- सचिन भारुटे, शिक्षक