आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 01:16 PM2024-11-13T13:16:37+5:302024-11-13T13:17:25+5:30
मंठा तालुक्यातील तळणी सर्कल मधील देवठाण्यातील प्रकार
तळणी (जि. जालना) : आ. बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे मंगळवारी देवठणा- उस्वद गावात प्रचारासाठी गेल्यानंतर काही जरांगे पाटील आंदोलन समर्थक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी लोणीकर समर्थकांनी त्या युवकांना शिवीगाळ केली.
परतूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरक्षण प्रश्नावर प्रमुख नेते ताक ही फुंकून पित असताना आ. बबनराव लोणीकरांनी आष्टी (ता. परतूर) येथील मराठा समाजाच्या संख्येबाबत केलेल्या वक्तव्यानंतर समाजातून रोष व्यक्त केला जात आहे. त्यात लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे प्रचारादरम्यान मंगळवारी देवठाणा-उस्वद गावात ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी संतप्त लोणीकर कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या उपस्थितीत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर लोणीकर समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत जरांगे पाटील समर्थकांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. त्याचा व्हिडीओ ही समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, समाजाबाबत केलेले वक्तव्य लोणीकरांना भोवणार असल्याच्या भावनाही आता व्यक्त केल्या जात आहेत.
'त्या' व्हायरल व्हिडिओत नेमकं काय ?
देवठाणा येथे प्रचारादरम्यान जरांगे पाटील समर्थकांनी राहुल लोणीकरांना आरक्षणाच्या प्रश्नांवरून सरबत्ती करतानाचा एक व्हिडीओ तर दुसऱ्या व्हिडिओत लोणीकर समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत जरांगे समर्थकांना बाजूला घेऊन शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
विधिमंडळात भूमिका मांडली : लोणीकर
मराठा आरक्षणाबद्दल आ. लोणीकरांनी विधिमंडळात अधिकृत भूमिका मांडली आहे. आरक्षणावरून राजकारण करत लोकसभेत स्वार्थ साधलेल्या बीडचे खा. बजरंग सोनवणे व परभणीचे खा. संजय जाधव यांनी निवडणूक येताच कोणती भूमिका मांडली ? असाही प्रश्न यावेळी राहुल लोणीकर यांनी जरांगे समर्थकांना विचारला.