बदलत्या वातावरणामुळे रब्बीची पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:32 AM2021-01-23T04:32:22+5:302021-01-23T04:32:22+5:30
गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या ...
गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या भागात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या वातावरणामुळे गहू, हरभऱ्यासह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले असून, गारपिटीचा धोकाही व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामातील पिके हाती येण्यास मोठा कालावधी आहे. त्यातच ही रोगराई पसरल्याने शेतकरी महागडी औषधे पिकांवर फवारणी करीत आहेत. रोगराईमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
मार्गदर्शनाची गरज
बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी विविध कंपन्यांची औषधे फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर असलेले संकट पाहता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
अमरजित देशमुख, आन्वा