एका भरणी वाचून रब्बी हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:35+5:302021-03-05T04:30:35+5:30
टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन ...
टेंभुर्णी : टेंभुर्णीसह कालवा परिसरातील शेतक-यांनी धरणातून तीन वेळा पाणी सुटेल या आशेवर उशिरापर्यंत रब्बीची पेरणी केली. मात्र दोन पाणी सोडल्यानंतर तिस-यांदा पाणी सोडण्यात पाटबंधारे प्रशासन असमर्थता दाखवित असल्याने कालवा परिसरातील शेतक-यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दरम्यान, जीवरेखा धरणातून आणखी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.
अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून काढलेल्या १७. ६ कि. मी. लांबीच्या कालव्याचा टेंभुर्णी, अकोलादेव, गोंधनखेडा, सावंगी, पापळ परिसरातील १,२९९ हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामासाठी लाभ होतो. यावर्षी शेतक-यांनी उशिरापर्यंत गहू, हरभरा, शाळू ज्वारीची पेरणी केली. परिसरात आणखी या पिकांना पाण्याची गरज असताना जीवरेखा धरण प्रशासनाने पाण्याच्या दोन अवर्तनानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी थांबविले आहे. एरवी धरण तुडुंब भरले असताना धरणातून रब्बी हंगामासाठी तीनवेळा पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी पहिले पाणी उशिरा सुटल्याने धरणातून केवळ दोनदाच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना धरणातून सुटणारे पाणी रोखल्याने शेतकरी हतबल झाले आहे.
पाटबंधारे विभागाने कमीत कमी आठ दिवसांसाठी तरी एक पाणी सोडावे, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे. एका भरणी वाचून कालवा परिसरातील शेतक-यांचा रबी हंगामच धोक्यात आल्याची प्रतिक्रिया शेतकरी कमळाजी जमधडे यांनी बोलून दाखविली. सध्या परिसरातील सर्व शेतक-यांच्या नजरा धरणातून सुटणा-या पाण्याकडे लागल्या आहेत.
चौकट
रब्बी हंगामासाठीच्या पाण्याची मुदत नियमाप्रमाणे २८ फेब्रुवारीला संपलेली आहे. मात्र टेंभुर्णी, अकोलादेव परिसरातून शेतकरी आणखी एका पाण्यासाठी मागणी करीत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांंकडून जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीनंतरच पाणी सोडण्याबाबत काय तो निर्णय घेतला जाईल.
माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, टेंभुर्णी.