जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:51 AM2018-12-28T00:51:18+5:302018-12-28T00:51:38+5:30
कचरेवाडी येथे विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा मारत ७ जणांना ताब्यात घेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील कचरेवाडी येथे विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा मारत ७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह १ लाख ६८ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालना तालुक्यातील कचरेवाडी शिवारातील तुळजाराम देवावाले यांच्या शेतात झन्ना- मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी बुधवारी रात्री उशिरा कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह या जुगार अड्ड््यावर छापा टाकला.
यावेळी जुगार खेळतांना जितेश चुन्नीलाल भुरेवाल (वय ३७, रा. कालीकुर्ती, जालना), राम गोविंदराव ठोकळ (वय ५०), दामोदर ज्ञानेश्वर कचरे (वय ४२), संतोष आसाराम कचरे (वय ३८), हरिभाऊ तुळशीराम कचरे (वय ३२), त्रिंबक नारायण कचरे (वय ४२), गणेश अशोक मैंद (वय ३२, सर्व रा. कचरेवाडी) यांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.
यावेळी रोख ११ हजार ७६० रुपये, २७ हजार २०० रुपयाचे चार मोबाईल आणि १ लाख ३० हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पो. हवा. ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, नंदकिशोर कामे यांनी केली आहे.