वडीगोद्री, राजूर येथे पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:20 AM2020-03-19T00:20:56+5:302020-03-19T00:22:07+5:30

वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

Rain damage at Vadigodri, Rajur | वडीगोद्री, राजूर येथे पावसाने नुकसान

वडीगोद्री, राजूर येथे पावसाने नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : वडीगोद्री आणि गोंदी मंडळात मंगळवारी अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका फळबागांनाही बसला आहे. वडीगोद्री मंडळात या अवकाळी पावसामुळे प्राथमिक पाहणी अंदाजानुसार सुमारे २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात वडीगोद्री मंडळात ८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून गोंदी मंडळात जवळपास ११४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्रशासनाकडून सांगणयत आले. दरम्यान या नुकसनीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
राजूरसह परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह बिगरमौसमी गारांचा पाऊस झाल्याने रबी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. राजूरसह परिसरातील तपोवन, तपोवन तांडा, चणेगांव, लोणगांव, थिगळखेडा, खामखेडा आदी भागात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.
आमदार कुचे, तहसीलदारांकडून पाहणी
बदनापूर : तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी आमदार नारायण कुचे व तहसीलदार छाया पवार यांनी बुधवारी आन्वी, उज्जैपुरी, वाल्हा, भराडखेडा या गावातील शिवारातील शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी अनिल कोलते, भगवान बारगाजे, भगवान घाडगे,परमेश्वर शिंदे, संजय जगदाळे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठ्यांची उपस्थिती होती. मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबी हंगामातील पिकांसह मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. या पावसाने निकळक, राळा, केळीगव्हाण, आन्वी, वाल्हा, उज्जैनपुरी, भराडखेडा, तळणी, म्हसला, लोधेवाडी ,नांदखेडा,सोमठाणा अशा अनेक गावांमधे गारपीट झाली. पावसात गहू, हरभरा,मोसंबी, डाळींब अशी विविध पिके, फळबाग व भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले.यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे वास्तव आकडे समोर येण्यासाठी तहसीलदार छाया पवार यांनी पंचनामे करण्याच्या सूचना लवकरच दिल्या जातील असे सांगितले.
मापेगाव येथे गारपीट
सातोना : परतूर तालुक्यातील मापेगाव खु. येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मापेगाव खु. येथील शाकेर शेख यांच्या मोसंबी, गहू, टरबूज, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसात गारपीट असल्याने उभी पिके आडवी झाली. याच भागात बापूराव काकडे, राम बिजुळे, दत्ता तरवटे, छगन तरवटे, महंमद नासेर यांचे मोठे नुकसान झाले.
फळबागांचे नुकसान
वरफळ : जिल्ह्यासह विदर्भात मंगळवारी काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वरफळ परिसरातील मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर, गहू, हरभरा, मका पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

Web Title: Rain damage at Vadigodri, Rajur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.