महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वरुणराज अखेर प्रसन्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:58 AM2018-07-15T00:58:52+5:302018-07-15T00:59:35+5:30
महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
पावसाळा सुरु होऊन तब्बल एका महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नव्हता. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या व लागवड खोळंबली होती. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसावरच काही शेतक-यांनी पेरण्या व लागवड केली होती. तर काही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रिमझिम पाऊसही पडत होता. परंतु जोरदार पाऊस झाला नाही. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील जालना, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, अबंड या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. तब्बल एक ते दोन तास झालेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जालना शहरातील नाल्या भरुन वाहिल्या. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच ताराबंळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस बरसल्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंद झळकणार आहे.
खरिपाच्या पिकांना तारले
जिल्ह्यात महिन्याभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतक-यांची पिके करपून गेली होती. परंतु , गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत होता. त्यातच शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
शेतकरी सुखावला
पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलडला आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेंक शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परिणामी, शेतकरी चिंतेत सापडला होता.
पाऊस : परतूर, भोकरदन जोरदार बरसला
परतूर : शहरात दोन ते तीन तास जोरदार पाऊस बरसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने मोटार सायकल, स्कूटी सारखी वाहने बंद पडल्याचे प्रकार घडले. दरम्यान, या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती.
भोकरदन तालुक्यात शनिवारी चार वाजेच्या सुमारास सर्वदुर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे खरिपाच्या मका, सोयाबीन, कापूस या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतक-यांनी शेतीवर करण्यात येणा-या खर्चाला सुध्दा आखडता हात घेतला होता. मात्र या पावसाने भोकरदनसह तालुक्यातील धावडा, वालसांवगी, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई, दानापुर, आव्हाना, केदारखेडा, राजुर, पिंपळगाव कोलते, तळेगाव, नळणी, सिपोरा बजार यासह तालुक्यातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.