भोकरदन परिसरात पावसाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:39 AM2018-11-05T00:39:17+5:302018-11-05T00:39:33+5:30
तालुक्यात रविवारी सायंकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने परिसरात वातावरणात गारवा पसरला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शहरासह तालुक्यात रविवारी सायंकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने परिसरात वातावरणात गारवा पसरला होता.
पावसाअभावी तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पावसाअभावी खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. तसेच रबीच्या हंगामावरही परिणाम झाला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असताना परिसरात भायडी, दानापूर, विरेगाव परिसरात सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील वातावरण ढगाळमय झाले होते. तसेच परिसरात सध्या गरमीमुळे नागरिक हैराण आहेत. पीक वाया गेल्यानंतर पावसाने हजेरी लावली. यामुळे या पावसाचा पिकांना फायदा होण्याची शक्यता कमीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे जुई धरण कोरडेठाक असल्याने यामुळे जोरदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
पावसामुळे वेचणीस आलेला कापूस धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ परिसरात रविवारी झालेल्या रिमझिम पावसाने वेचणीस आलेल्या कपाशी भिजल्याने कपाशीचे नुकसान झाले. परिसरात आधीच अल्पशा पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी विहिरीच्या पाण्यावर कपाशीचे पीक जोपासले आहे. सध्या कपाशी वेचणीस आली आहे. मात्र परिसरात अचानक रिमझिम पाऊस सुरु झाला आहे.
पाऊस अजून जर असाच सुरु राहिल्यास शेतकºयांचे पांढरे सोने धोक्यात येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होणयाची चिंता शेतक-यांना सतावत आहे. खरीप हंगामात डोळ्यात प्राण आणून पावसाची प्रतीक्षा केली; मात्र पावसाने दगा दिला. ऐन कापूस वेचणीच्या वेळेत पावसाने सुरुवात केल्याने शेतात फुटलेला कापुस ओलाचिंब झाला. दोन दिवसापासून ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पहायला मिळत होते. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने हाताशी आलेल्या पिकांची नासाडी होत आहे.
तसेच कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतक-यांना लागली आहे.