दिवाळीत पावसाची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:14 AM2019-10-27T00:14:46+5:302019-10-27T00:15:03+5:30
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सोयाबीन आणि कपाशीला याचा मोठा फटका बसला आहे. या परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नव्यानेच निवडून आलेले आ. कैलास गोरंट्याल तसेच आ. राजेश टोपे आणि माजी आ. अर्जुन खोतकरांनी केली आहे.
जालना जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरी एवढाही पाऊस पडतो की, नाही अशी चिंता होती. परंतु पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने मोठी मुसंडी मारून जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान, यापूर्वीच भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. परंतु अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे या भागात दुष्काजन्य स्थिती होती. ती आता दूर झाली असून, आता सोयाबीनची सोंगणी आणि कपाशी काढणीला या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
परतीच्या पावसामुळे सर्वात जास्त फटका सोयाबीनला बसला असून, कपाशीच्या कैºयातून पुन्हा कोंब निघाल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडले आहे. जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पीरकल्याणसह रामनगर परिसरातील द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे दिवाळी सणाचे कारण न देता तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांशी चर्चा करताना केली. तसेच आमदार राजेश टोपे यांनी देखील या संदर्भात एक निवेदन दिले असून, त्यात त्यांनी जिल्हाधिका-यांनी पथक नेमून पंचनामे करावे अशी मागणी केली आहे.
परतीच्या पावसाने ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे, त्या नुकसानाची माहिती एकत्रित करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाने त्यांच्या तालुका पातळीवरील अधिकाºयांना या पूर्वीच दिले आहेत.
तसेच पीकविमा कंपनीच्या अधिका-यांनी देखील तातडीने ज्या गावातून पीकविमा काढलेला आहे, अशा गावात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, असेही कृषी विभागाने विमा कंपन्यांना सांगितले आहे.