परतूर तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:08 AM2018-08-21T01:08:12+5:302018-08-21T01:08:28+5:30
दोन दिवसाच्या खंडानंतर पुन्हा पावसास सुरूवात झाली असून रविवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यात दोन दिवसाच्या खंडानंतर पुन्हा पावसास सुरूवात झाली असून रविवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे.
तालुक्यात मागील २० ते २५ दिवसापासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या गुरुवारपासून पासून पडत असलेल्या पावसाच्या अगमनाने शेतकरी सुखावला आहे. ब-याच दिवसा पासून पाऊस गायब झाल्याने जोरदार आलेली पिके हातातून जातात की, काय अशी भीती शेतक-यांत निर्माण झाली होती. विहिरी, बोअर तलावांनी तळ गाठला होता. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला. मात्र १५ आॅगस्टच्या रात्री पासून दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. नद्या, नाल्यांना पाणी आले, पाणी पातळीतही वाढ होत आहे. आता दोन दिवसाच्या खंडानंतर रविवारीच्या मध्यरात्री नंतर पुन्हा संतत धार पावसाने हजेरी लावली. सोमवारी तालूक्यात १४ .४० मि.मी. पावसाची नोंद झाली. पुन्हा सकाळपासून संतत धार रिमझिम पाऊस सुरूच आहे. या पावसाने आता शेतात पाणी भरत आहे.
शहरातील रस्त्याची दुर्दशा
शहरतील मुख्य रोडसह गल्ली बोळातील रस्ते काम सुरू असल्याने फोडण्यात आले आहेत. माती वर आल्याने चिखल होऊन वाहने फसत आहेत. मुख्य रोडवरील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक एका अरूंद रस्त्याने वळवण्यात आली आहे. हा रस्ताही फोडण्यात आल्याने चिखल व पाणी या रोडवर साचत असल्याने व हा रस्ता अरूंद असल्याने वाहतुकीची सतत कोंडी होऊन वाहनधारक त्रस्त होत आहे.
परतूर वाटूर रोडचे रूंदीकरण सुरू असल्याने रोड फोडण्यात आला आहे. यामुळे चिखल व खड्डे होऊन वाहने काही ठिकाणी घसरत आहेत, तर काही ठिकाणी फसत आहेत. या रोडवरून प्रवास धोकादायक बनला आहे. या कामावरील ठेके दारांनी अशा ठिकाणी मुरूम टाकणे आवश्यक आहे. मात्र या कामावरील ठोकेदार दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तशीच अवस्था शहरातही आहे. कुठेच वाहनधारकांची किंवा नागरिकांची काळजी नगरपालिका प्रशासन घेताना दिसत नाही. शहरात कुठेच मुरूम टाकला जात नाही. यामुळे या दोन्ही वाटूर-परतूर- आष्टी व शहरातील कामातून लोकांना मोठा मनस्ताप सध्यातरी सहन करावा लागत आहे.