भोकरदन, जाफराबादवर अवकृपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:11 AM2018-07-10T01:11:30+5:302018-07-10T01:12:00+5:30
जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या आठवडाभरात या दोन तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे. शनिवारी रात्री जालना ग्रामीण महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, यामुळे सामनगावसह अन्य गावामध्ये शेतक-यांच्या शेतात पाणी साचले आहे.
जालना तालुक्यातील सामनगाव व परिसरात शनिवारी रात्री थेट १२१ मिलिमीटर पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसामुळे देवलाल डोंगरे यांची विहिर पूर्णपणे खचली असून, अनेकांच्या शेतात पाणी तुंबल्याने त्याचा निचरा न झाल्याने पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रविवारी रात्री जालना, बदनापूर, परतूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. भोकरदन शहर व परिसरात १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद असून, रविवारी रात्री बदनापूर तालुक्यात ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. अंबड तालुक्यातही रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने वडीगोद्री सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले.