जालना जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:04 AM2018-04-17T01:04:23+5:302018-04-17T01:04:23+5:30
जालना जिल्ह्यातील काही भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील काही भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तालुक्यातील विरेगाव शिवाराला वादळी वा-याचा जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत पोल वाकल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला.
जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी काही वेळ ऊन पडल्यानंतर सायंकाळी पुन्हा ढग दाटून आले. जालना शहर व परिसरात काही वेळ वादळी वारे सुटले. तालुक्यातील विरेगाव, हस्तेपिंपळगाव, धानोरा, कवणातांडा, विरेगावतांडा भागात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. विरेगाव परिसरात मंठा रस्त्यालगतच्या हॉटेल्स, रसवंतीगृहांवरील पत्रे हवेमुळे उडाले. वादळी वा-यासह तासभर जोरदार पाऊस झाला. २० मिनिटे सुपारीच्या आकाराच्या गाराही पडल्या. गारपिटीमुळे अांबा, मोसंबीसह भाजीपाला, फळबागा व शेडनेटचे नुकसान झाले.
धानोरा शिवारातील वीट भट्ट्यांचे पावसामुळे नुकसान झाले. घनसावंगी तालुक्यातील राजेगाव, गुरुपिंप्री, मोहपुरी, पनवाडी, हिवरा, बहीरगड, बोलेगाव, रांजणी भागात तासभर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परतूर शहर व परिसरात सायंकाळी हलका पाऊस झाला.
टेंभूर्णीसह परिसरात सोमवारी वादळी वा-यामुळे केशर आंब्याचे नुकसान झाले. यावर्षी केशर आंब्याला चांगला बहर आला होता. मात्र, नैसर्गिक संकटाने केशर आंब्याचे नुकसान झाल्याचे आंबा उत्पादक संजय मोरे, माधवराव अंधारे, गजेंद्र खोत, शंकर खोत यांनी सांगितले.