जालन्यात पावसाचा कहर; पिकांमध्ये पाणी, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 03:40 PM2021-09-28T15:40:10+5:302021-09-28T15:43:28+5:30
rain in jalana : जिल्ह्यातील १३ महसूल मंडळाला अतिवृष्टीचा फटका
जालना : ज्या पावसाची प्रतीक्षा अतुरतेने पाहिली जात होती त्यांचा अतिवृष्टी रूपी कहर पाहता अनेकांना पाऊस कधी थांबेल अशीच चिंता लागली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ४७.९० मिमी पाऊस झाला असून, ४९ पैकी १३ महसूल मंडळाला अतिवृष्टीने झोडपले आहे.
चालू महिन्यात जिल्ह्यात जणू पावसाचा कहर झाला आहे. जिल्ह्याची आजवर अपेक्षित वार्षिक सरासरी ५९३.६५ मिमी आहे. परंतु, या सरासरीपेक्षा अधिक एक हजार मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे दहा दरवाजे मंगळवारी सकाळी पुन्हा उघडण्यात आले आहेत. मंठा, घनसावंगी, अंबड तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. भोकरदन तालुक्यातील दानापूर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जुई नदी दुथडी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पारध येथून वाहणाऱ्या रायघोळ नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. भोकरदन तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा मध्यम प्रकल्पही मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाला असून,केदारखेडा भागातून वाहणारी गिरजा- पूर्णा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. शिवाय जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी रात्री, मंगळवारी दिवसभरात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या- सुरल्या आशाही आता पाण्यात गेल्या असून, खरिपातील उत्पन्नाची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत.
Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण
या मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा
भोकरदन तालुक्यातील धावडा (१०५.३ मिमी), आन्वा (१२० मिमी), पिंपळगाव (६६.३ मिमी), जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी (९५.३ मिमी), वरूड (१३१.५ मिमी), जालना तालुक्यातील पाचन वडगाव मंडळात ६५ मिमी पाऊस झाला आहे. अंबड (६७. मिमी), धनगरपिंपरी (६६.३ मिमी), गोंदी (१०१ मिमी), वडीगोद्री (११६ मिमी), सुखापुरी (८८.३ मिमी), बदनापूर तालुक्यातील सेलगाव मंडळात ६६. ५ मिमी पाऊस झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी मंडळात ६६.५ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक १७६.४४ टक्के पाऊस
जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मिमी आहे. या सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १७६.४४ टक्के (१०७६ मिमी) पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता जालना तालुक्यात १७४.२० टक्के, बदनापूर तालुक्यात १६६.५७ टक्के, भोकरदन तालुक्यात १६९.५७ टक्के, जाफराबाद तालुक्यात १५४.८७ टक्के, परतूर तालुक्यात १६४.११ टक्के, मंठा तालुक्यात १५९.५९ टक्के, अंबड तालुक्यात २१४.४९ टक्के तर घनसावंगी तालुक्यात १८५.९५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे.
गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली