तोतया महिला उभी करून, जमीनीचा मावेजा लाटण्याचा प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:36 AM2019-03-02T00:36:44+5:302019-03-02T00:37:14+5:30
जालना शहरातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गात संपादीत जमीनीची रजिस्ट्री करताना बनावट मालकिन उभी करून ६३ लाख रूपयांचा मावेजा उलण्यासाठीचा हा खटाटोप समोर आला आहे.
संजय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गात संपादीत जमीनीची रजिस्ट्री करताना बनावट मालकिन उभी करून ६३ लाख रूपयांचा मावेजा उलण्यासाठीचा हा खटाटोप समोर आला आहे. मात्र, पोलीसांकडे ही तक्रार आल्यानंतर चौकशी केल्यावर यातील तथ्य आज तरी पुढे आले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील रहिवासी -हल्ली मुक्कम औरंगाबादेतील तक्रारदार शरीफा बेगम मोहंमद अब्दुल गणी यांनी तक्रार दिली आहे.
या संदर्भात पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, जालना शहराजवळून मुंबई ते नागपूर हा महामार्ग जात आहे. या महार्गासाठी जमीन संपादन करताना अनेक चुकीच्या पध्दतीने जमिनीचे संपादन झाल आहे. या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. असे असताना प्रशासानाकडून मात्र, याचा इन्कार केला जात होता. परंतु आज यातील तथ्य समोर आले असून,आज दाखल झालेला हा गुन्हा म्हणजे हिमनगाचे एक टोक असून, जालन्यात समृध्दी महामार्गासाठी जमीन संपादनाची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा समोर येऊ शकतो. असे सांगण्यात आले.
या प्रकरणाचा तपास कदीम जालना पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार के.एस. मीमरोट हे करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात दोन आरोपी असून, ते सध्या फरार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणा सारखेच आणखी एक प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता असून, जवळपास ९० लाख रूपयांचे ते प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचीही उच्च स्तरावरून चौकशी सुरू आहे.
पानशेंद्रा येथील गट क्रमांक ४१ मध्ये शरीफा बेगम मोहंमद अब्दुल गणी यांची जवळपास चार एकर सहा गुंठे शेतजमिन आहे. ही जमिन समृध्दी महामार्गासाठी संपादीत झाली आहे. परंतु ही जमीन संपादन करताना अंबड येथील दुय्ययम निबंधक कार्यालयात एक चुकीच्या पध्दतीने जीपीओ- अर्थात कुलमुक्त्यार पत्र तयार केले गेले. त्या आधारे भोकरदन येथेही एका जमीनी संदर्भात हेच रेकॉर्ड उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.
सदरील बनावट मालकिण असणारी ही महिलाही मुस्लिम समाजातील दर्शविण्यात आल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे.
सदरील महिलेचे केवळ मतदान कार्ड दाखवून हा जीपीओ तयार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी झालेल्या चौकशीत पुढे आले आहे.
महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच अन्य अधिकाऱ्यांची दिशाभूल करून हा समृध्दीचा मावेजा लाटण्याचे षडयंत्र होते.
परंतु कदीम जालना पोलीस ठाण्यात हे प्रकरण दाखल होताच पोलीसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क करून ६३ लाख रूपयांचा मावेजा न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.