राजेश नहार खून प्रकरण; दोन मारेकऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:10 AM2020-01-23T01:10:33+5:302020-01-23T01:10:50+5:30
परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांचा ११ जानेवारीला जालना ते मंठा मार्गावरील शिंगाडी पोखरी येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता. दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांचा ११ जानेवारीला जालना ते मंठा मार्गावरील शिंगाडी पोखरी येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणा-या राजेश नहार हत्याकांडातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली होती. नहार यांना जालन्यातील व्यापारी विजयराज सिंघवी यांच्यावर गोळीबार करण्यासह बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या घरावर प्राणघातक हल्ला करण्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. नहार यांनी मुनोत यांना जिवे मारण्यासाठी ५० लाख रूपयांची सुपारी दिली होती. त्या पैकी पाच लाख रूपये संबंधित शूटरला दिलेही होते. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या दोन शूटरलाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
अट्टल गुन्हेगार : १० ते १२ गंभीर गुन्हे
राजेश नहार खून प्रकरणातील अटक आरोपींपैकी रघुवीरसिंग टाक याच्या विरूध्द यापूर्वीच १० ते १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याला साथ देणारा अरविंद भदरगे याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसून आले.
या दोघा संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना त्यांचे सर्वस्व पणाला लावावे लागल्याचे दिसून आले. मिळालेली गुप्त माहिती नव्याने तपासण्यासह त्याची पडताळणी करणे आणि आरोपींचा माग काढणे हे देखील मोठे आव्हान होते.