Rajesh Tope : आरोग्यमंत्र्यांची तत्परता, जालना जिल्ह्याला 10 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 08:06 PM2021-04-14T20:06:43+5:302021-04-14T20:07:50+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या जालना जिल्ह्याला 10 हजार रेमेडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा केला आहे
मुंबई - राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून आरोग्य यंत्रणेत ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन आणि मनुष्यबळ कमी पडत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, रेमडीसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असतानाहीसुध्दा हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. या इंजेक्शनचा साठा करून ठेवला आहे का? याबाबतही स्पष्टता नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. मात्र, आरोग्यमंत्री आणि सरकारकडून रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या जालना जिल्ह्याला 10 हजार रेमेडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा केला आहे. ''गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमेडिसेंविर इंजेक्शनची कमतरता भासू नये या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यासाठी दहा हजार रेमेडिसेंविर इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले आहेत. जालना येथील करवा मेडिकल एजन्सी येथे खासगी रुग्णालयांना प्रातिनिधिक स्वरूपात रेमेडिसीविर इंजेक्शनचे वाटप केले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना रेमेडिसेंविर इंजेक्शनचा पुरवठा हाफकीनमार्फत करण्यात येत असल्याची'' माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यामुळे, लवकरच राज्यात रेमेडेसिवीरचा मुबलक पुरवठा होईल, असे दिसून येत आहे.
जालना येथील करवा मेडिकल एजन्सी येथे खाजगी रुग्णालयांना प्रातिनिधिक स्वरूपात रेमेडिसेंविर इंजेक्शनचे वाटप केले.राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना रेमेडिसेंविर इंजेक्शनचा पुरवठा हाफकीनमार्फत करण्यात येत आहे. pic.twitter.com/42ETNo1SGq
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 14, 2021
राज्यातील अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर आल्याने रूग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली वणवण आणि लूटमार थांबविण्यासाठी शासनानेच रुग्णालयांत रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा त्वरीत उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील आरोग्य विभागाने थेट रुग्णालयातूनच रेमेडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा रुग्णांना करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेमडेसिविर कधी, केव्हा, कुठे द्यावं?
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाबाधितांचे नातेवाईक, कुटुंबीयांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सर्वांना अतिशय कळकळीचं आवाहन केलं आहे. 'रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही. रेमडेसिविर घेतल्यानं प्राण वाचले असं होत नाही. त्यानं फार फार तर रुग्णाचा रुग्णालयातला कालावधी १ ते २ दिवसांनी कमी होतो,' असं डॉ. ओक यांनी सांगितलं.
औषध विविध प्रकारची असतं. रेमडेसिविर हे अँटिव्हायरल प्रकारात मोडणारं औषध आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसची शरीरात वाढ मोठ्या प्रमाणात होते, ती रोखण्याचं काम रेमडेसिविर करतं. मी डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगतो की रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही. रेमडेसिविर दिल्यानं प्राण वाचले असं होत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. शरीरातील ऑक्सिजनची पातळी, व्हिटामिन सी, झिंक, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रेमडेसिविर योग्य त्या रुग्णालाच दिलं जावं. ते सरसकट देण्याचं औषध नाही, असं ते पुढे म्हणाले.